मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीबरोबरच बॉलिवूडची सुद्धा ती लाडकी बनली आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी प्रिया आता मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर आपल्या अभिनयाची झळक दाखवत आहे. याशिवाय प्रियाने निर्माती म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली आहे. तिचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे. ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने आपला सशक्त अभिनय केला आहे. (priya bapat news)
अभिनेत्री, निर्माती असण्याबरोबरच प्रिया ही एक उत्तम गृहिणीही आहे आणि याबद्दल तिने स्वत: एक किस्सा सांगितला आहे. प्रिया बापट शूटिंगवरुन कितीही वाजता घरी गेली तरी तिला स्वयंपाकघराचा ओटा साफ करण्याची सवय आहे आणि याबद्दल तिने स्वत: सांगितलं आहे. ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी प्रियाने असं म्हटलं आहे की, “मला अजूनही ती सवय आहे की, मी कितीही वाजता घरी आले तरी मी स्वयंपाक घरात जाते आणि ओटा स्वच्छ आहे की नाही ते बघते. नसेल तर मी तो ओटा साफ करते”.
यापुढे ती म्हणाली की, “त्यानंतर मी पाणी भरते, माझी बाटली भरते आणि मगच बेडरुममध्ये जाते. अगदी कितीही म्हणजे कितीही वाजले असले तरी मी हे करते. पहाटे दोन-तीन-चार, रात्री बारा, सकाळची शिफ्ट, रात्रीची शिफ्ट काहीही असूदे. मी आले की चप्पल काढते आणि लगेच स्वयंपाकघरात जाते. ओटा बघते, ओटा स्वच्छ असेल की नाही बघते, नसेल तर करते आणि मगच झोपते. तर अशी आहे प्रिया बापट, आवडले तर आवडले? नाही आवडले तर काय करु?”
दरम्यान, टेलिव्हिजन मालिका असो किंवा रुपेरी पडदा मनोरंजन विश्वातील प्रत्येक माध्यमात प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रियाने मराठीसह अनेक हिंदी सीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रिया उत्तम अभिनेत्री आहेच पण, त्याचबरोबर तिचा आवाज देखील तितकात सुमधूर आहे. अनेकदा प्रिया जुनी गाणी गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.