बॉलिवूड अभिनेता फरदीन खान हा त्याच्या खासगी आयुष्यातील काही कारणामुळे चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्याच्या घटस्फोटांच्या अफवा. फरदीनने पत्नीला रोमँटिक पद्धतीने लग्नाची मागणी घातल्यानंतर त्यांनी २००५ साली धुमधडाक्यात लग्न केलं होतं. त्यानंतर फरदीन त्याची पत्नी नताशा माधवानीपासून वेगळा होत असून हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. अशातच आता फरदीन खानचा घटस्फोट झाला असून, तो आपल्या कुटुंबाबरोबर राहत नाही अशी चर्चा रंगली आहे. नुकतंच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत फरदीन खानने आपण मुलांबरोबर राहत नसल्यामुळे त्यांची फार आठवण येत असल्याचं सांगितलं आहे. यामुळें अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Fardeen Khan News)
फरदीन खानने मुलाखतीत सांगितलं की, “हे फार सोपं नाही. ते माझ्यापासून दूर का आहेत याच्यात मला जायचं नाही. पण हो, हे फार सोपे नाही. मला त्यांची फार आठवण येते. दर चार ते सहा आठवड्यांनी मी त्यांना भेटतो. आम्ही रोज व्हिडीओ कॉलद्वारे बोलतो. पण ते माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग नाहीत. त्यांना मोठं होताना न पाहणं, त्यांची ओळख निर्माण करण्यात मदत करणं या सर्वांबद्दल फार वाईट वाटतं. माझी मुलं चित्र काढतात. मी त्यांनी काढलेली चित्रं मुंबईतील घराच्या भिंतीवर लावली आहेत”
मुलांपासून दूर राहत असल्याची आपली खंत व्यक्त करताना फरदीन असं म्हणाला की, “मला त्यांच्या मिठ्या, चुंबनं यांची आठवण येते. लक्ष विचलित करण्यासाठी मी सतत काम करत असतो. पण जेव्हा कधी ते मुंबईत येतात तेव्हा मी सर्व काम बाजूला ठेवतो आणि त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असतो”. फरदीन खानने अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानीबरोबर लग्न केलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत. फरदीन खान नुकताच ‘खेल खेल में’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर यांच्याबरोबर दिसला होता.
आणखी वाचा – सारा अली खानच्या नवीन प्रॉपर्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क, मुंबईत खरेदी केली इतकी महागडी जागा
दरम्यान, फरदीन खानने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमधून तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या अभिनेता ‘हाऊसफुल ५’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल’चा एक भाग आहे. आगामी वर्षी म्हणजेच २०२५ जून मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.