फराह खान आणि तिचा कूक दिलीप यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दिलीप फराहबरोबर स्वयंपाक संदर्भातील विविध व्लॉगमध्ये दिसतो. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच सेलिब्रिटींसह त्याने शूट केलं आहे. फराहही त्याला अगदी तिच्या कुटुंबासारखंच वागवते. परदेशातही स्वतःबरोबर घेऊन जाते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटी मंडळींनी दिलीपचं आतापर्यंत तोंडभरुन कौतुक केलं आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याचाही आज एक वेगळाच चाहतावर्ग आहे. दिलीपचं सामान्य आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. फराहमुळे त्याला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्याही त्याला फराह मदत करत आहे. आता तिने दिलीपच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही हाती घेतली आहे. (farah khan cook dilip kids)
नव्या व्लॉगमध्ये फराहने दिलीपच्या मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती दिली. दिलीपची मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून ती प्रयत्न करत आहे. त्यांना इंग्रजी माध्यमामध्ये ती शिकवणार आहे. फराह व दिलीप शूटसाठी सुप्रसिद्ध अभिनेता शालिन भनोतच्या घरी गेले होते. यावेळी बऱ्याच गप्पा रंगल्या. दिलीपने शालिनच्या घरी जेवण बनवलं. यावेळी शालिनच्या आईशी संवाद साधताना फराहने दिलीपच्या मुलांच्या शिक्षणाबाबत भाष्य केलं.
फराह म्हणाली, “आता आमचा शो सुरु आहे. याच्या मुलांना आम्ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकवत आहोत. त्याचा अजून एक मुलगा क्युलिनरी शाळेतून डिप्लोमा करत आहे. दिलीपची मुलं कोणत्याच घरात काम न करता त्यांनी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये काम करावं असं वाटतं”. दिलीपच्या मुलांनी दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करु नये अशी फराहची इच्छा आहे. दिलीप इतक्या लोकांचं पोट भरतो तर त्याच्याबरोबरही चांगलंच होणार असं फराहचं म्हणणं आहे.
दिलीपनेही मध्यंतरी एका व्लॉगमध्ये मुलांच्या शिक्षणाबाबत सांगितलं होतं. फराह मुलांच्या शिक्षणाचं सगळं बघत असल्याचं तो म्हणाला होता. दिलीपची पत्नी व मुलं गावीच आहेत. बिहारमधील दरभंगा भागात दिलीपचं कुटुंब राहतं. मध्यंतरी तर दिलीपने व्लॉगद्वारे त्याचं घरही दाखवलं होतं. गावातील मंडळी दिलीपला पाहून अगदी खूश झाली होती. फराहसह दिलीपने केलेली प्रगती खरंच कौतुकास्पद आहे.





