अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट ‘शेरशाह’ हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला. मात्र या चित्रपटातील गाण्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. यातील एक शेवटचं गाणं चांगलंच चर्चेत राहिले. ‘मन भरेया’ हे गाणं प्रेक्षकांच्या खूप लक्षात राहिलं आहे. हे गाणं बी प्राक या पंजाबी गायकाने गायलं आहे. मनोरंजन क्षेत्रात बी प्राकच्या सर्वच गाण्यांना खूप पसंती मिळाली आहे. त्याने पंजाबी तसेच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. तसेच त्याचे अनेक पंजाबी म्युजिक अल्बमदेखिल प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि पसंतीसदेखील पडले. व्यावसायिक आयुष्याबरोबर त्याचे खासगी आयुष्यदेखील अधिक चर्चेत राहिले आहे. गायकाने त्याच्या नवजात मुलाला जन्मानंतर लगेच गमावले त्याबद्दल त्याने भाष्य केले आहे. (b praak baby death incidence)
बी प्राकने नुकतीच शुभांकर मिश्राच्या मुलाखतीसाठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. यावेळी शुभांकरने त्याला आध्यात्माकडे कल जास्त असण्याबद्दल विचारले. त्यावर बी प्राक म्हणाला की, “२०२१ साली मी माझ्या काकांना गमावलं, त्याच वर्षी वडिलांचंदेखील निधन झाले. पण लगेचच मी माझ्या नवजात मुलालाही गमावलं. जेव्हा मुलाला गमावलं तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं. खूप नकारात्मकता आली होती”.
पुढे तो म्हणाला की, “ही घटना मी माझ्या पत्नीला सांगू शकत नव्हतो. मला समजत नव्हते की मी मीराला कसं सांगणार आहे ते. बाळ आयसीयूमध्ये आहे असं मी पत्नीला सांगत होतो. पण आम्ही जर तिला सांगितलं असतं तर तिला ते सहन नसतं झालं”.
बी प्राकने पुढे सांगितले की, “जेव्हा मी माझ्या मुलाचा मृतदेह उचलला तेव्हा तो प्रसंग खूप कठीण होता. त्याच्यावर अंतिम संस्कार केल्यानंतर जेव्हा रुग्णालयात परत आलो तेव्हा माझी पत्नी रडत होती. मुलाचा चेहरादेखील तिने पाहिला नव्हता. मला माझ्या मुलाचं वजन अधिक वाटलं होतं. त्यापेक्षा जड आतापर्यंत मी काहीही उचललं नव्हतं. आमच्यासाठी तो खूप कठीण प्रसंग होता. ते मी कधीही विसरणार नाही”.बी प्राकने ४ एप्रिल २०१९ रोजी मीरा बच्चनबरोबर लग्न केले. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना पहिले मूल झाले. त्यानंतर २०२२ साली दोघंही दुसऱ्या मुलाच्या येण्याची वाट बघत होते. पण मुलाच्या जन्मानंतर लगेचच चिमूकल्याचे निधन झाले. हा धक्का न पचणारा होता.