ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर देव कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ८१व्या वर्षी सीमा यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वर्षभरापूर्वीच सीमा यांचे पती व ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांचं निधन झालं. रमेश यांच्या निधनानंतर अगदी वर्षभराने सीमा यांचंही निधन झालं आहे. पण गेली काही वर्ष त्या गंभीर आजाराचा सामना करत होत्या.
सीमा यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. काही काळ काम केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमधून कायमचा ब्रेक घेतला. दरम्यान कालांतराने त्यांना एका गंभीर आजाराने घेरलं. अल्झायमर हा आजार सीमा यांच्या वाट्याला आला. या आजाराने त्या पूर्णपणे थकून गेल्या. शेवटी आज सकाळी अल्झायमर आजाराशी त्यांची सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
२०२०मध्येच सीमा देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देवने एक ट्वीट करत आईच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती. तसेच सीमा यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा अशी त्याने विनंतीही केली. मात्र त्यांचा हा आजार वाढू लागला. दरम्यान सीमा देव यांना बराच त्रासही सहन करावा लागला. त्यांच्या निधनानंतर अजिंक्यने दुःख व्यक्त करत आईच्या आजाराविषयी भाष्य केलं.
My mother Shrimati. Seema Deo doyen of marathi film industry is suffering from Alzheimer’s we the entire Deo family have been praying for her well being wish whole of Maharashtra who loved her so much also pray for her well being 🙏@mataonline @lokmanthannews @LoksattaLive
— Ajinkya Deo (@Ajinkyad) October 14, 2020
तो म्हणाला, आज माझी आई सीमा देव यांचं निधन झालं. सकाळी सात वाजता ती गेली. गेली तीन ते चार वर्ष ती अल्झायमर या आजाराचा सामना करत होती. पूर्ण विस्मृती तिला झाली होती. बाबांना जाऊन आता कुठे दिड वर्ष झालं होतं”. आईला काही आठवत नव्हतं, कळत नव्हतं पण ती होती”. आईच्या निधनाबाबत कळताच अजिंक्य भारावून गेला आहे.