सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या विविध चर्चा सुरु आहेत. बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण नेमकं काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. आर्थिक संकटामुळे नितीन देसाईंनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या या टोक्याच्या निर्णयामुळे संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नितीन देसाई यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
मराठीमधील अनेक कलाकारांनी “पुन्हा असा नितीन देसाई होणे नाही” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना नितीन देसाई यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली. या पोस्टद्वारे त्यांनी नितीन देसाईंबरोबर असलेलं नातं याबाबत भाष्य केलं. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मृणाल यांनाही मोठा धक्का बसला आहे.
मृणाल म्हणाल्या, “दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं. त्यांनी निर्माण केलेल्या ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली. त्यानंतर ‘रमा माधव’च्या दिग्दर्शनादरम्यान ते माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले”.
आणखी वाचा – दुर्देवी अंत! एनडी स्टुडिओमध्येच नितीन देसाई यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
पुढे त्या म्हणाल्या, “अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत. कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस. फार मोठा धक्का”. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. ४ ऑगस्टला (शुक्रवारी) एनडी स्टुडिओ येथे नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.