Rumani Khare wedding : प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची आनंदमयी लगबग सुरू होती. त्यांच्या लेकीचा म्हणजेच रूमानी खरे हिचा विवाहसोहळा पार पडणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत रूमानी खरे हिने तिचा जोडीदार स्तवन शिंदे याच्यासोबत लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रूमानी आणि स्तवन यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. डिसेंबर २०२५ मध्ये या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अखेर कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
लग्नाचे काही खास क्षण स्तवन शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रूमानीचा नवरीचा पारंपरिक लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. हिरव्या रंगाची सुंदर साडी, केसांत मोगऱ्याचा गजरा आणि साध्या पण आकर्षक दागिन्यांमुळे तिचा साज अधिक खुलून दिसत आहे. तर स्तवनने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली असून डोक्यावर पारंपरिक फेटा बांधलेला दिसतो. दोघांचाही हा पारंपरिक अंदाज चाहत्यांना खूप आवडत आहे. लग्नानंतर रूमानी आणि स्तवन यांनी एकमेकांना नमस्कार करत परंपरेला मान दिल्याचंही या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत असून अनेकांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – ‘कमळी’ फेम अभिनेत्री होणार आई; ‘ती’ पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझा प्रेग्नन्सीचा प्रवास…पाचवा महिना”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या दोघांचा संगीत समारंभही पार पडला होता. या कार्यक्रमात संदीप खरे यांनी आपल्या लेकीसोबत रंगतदार डान्स करत उपस्थितांची मने जिंकली होती. या खास क्षणाचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. रूमानी आणि स्तवन यांच्या या लग्नसोहळ्याने सध्या सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली असून चाहत्यांकडून नव्या आयुष्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.





