अभिनेत्री ईशा देओल व वडील धर्मेंद्र यांचं उत्तम बॉण्डिंग आहे. त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. धर्मेंद्र हे कठोर वडील असल्याचे तिने उघड केले असले तरी, ते ईशा देओल व तिची बहीण अहाना देओलसाठी नेहमीच ‘हिरो’ आहेत. बरेचदा ईशाने तिचे वडील धर्मेंद्र यांचे कौतुक करत भाष्य केलं आहे. अशातच ईशाने तिचे वडील धर्मेंद्र यांच्या शबाना आझमीसोबतच्या किसिंग सीनबद्दलही भाष्य केले. (Esha Deol On Dharmendra)
‘रॉकी और रॉनी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. याबाबत आता धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिने भाष्य केलं आहे. ‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या एका मुलाखतीत ईशा देओलला धर्मेंद्रच्या किसिंग सीनबद्दल विचारण्यात आले. यावेळी बोलताना ती स्वतःच लाजली आणि म्हणाली की, “आम्हाला या सीनबद्दल कोणतीही माहिती नव्हती. आमच्यासाठी हे एक सरप्राइज होतं. ते दोघेही खूप प्रेमळ वाटत होते आणि ते दोघेही प्रोफेशनल कलाकार आहेत.”
यापूर्वी हेमा मालिनी यांनीही चित्रपटांमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्पूर्वी हेमा मालिनी यांना विचारण्यात आले की, धर्मेंद्रसारखे ऑनस्क्रीन किसिंग सीन करण्यासाठी ती ‘ठीक’ आहे का? याबाबत india.com शी बोलताना हेमा मालिनी यांनी खुलासा केला की, एखाद्या सीनसाठी खरंच आवश्यकता असेल तर नक्की करेन. हेमा मालिनी त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर देत म्हणाल्या,“का नाही, नक्कीच करेन. जर ते चांगले असेल आणि चित्रपटाशी संबंधित असेल तर कदाचित मी असं करु शकते.”

धर्मेंद्र यांच्या सीनबद्दल प्रतिक्रिया देत हेमा मालिनी म्हणाल्या होत्या, “धरमजी व शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं,” असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.”