लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी होत असलेल्या पाहायला मिळत आहेत. अशातच प्रसिद्ध व लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या अनुराधा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काल (१६ मार्च शनिवार) रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात सामील झाल्यानंतर अनुराधा यांनी सनातन धर्माशी सखोल संबंध असलेल्या पक्षात गेल्याचा आनंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये अनेक सदाबहार गाणी गायली आहेत. ७०-८० च्या दशकात अनुराधा यांचे जवळपास प्रत्येक चित्रपटात गाणे असायचे. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या काळात अनुराधा यांनी स्वतःची सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र कालांतराने अनुराधा यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी होऊ लागली. त्यामुळे सर्व काही ठीक चालले असतानाही एके दिवशी अचानक अनुराधा यांनी घोषणा केली की, आता त्या फक्त ‘टी-सीरिज’ कंपनीसाठीच काम करणार आहेत.
मात्र त्यांच्या या धाडसी निर्णयाने हळूहळू संगीत विश्वातील त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दुरावल्याचे जाणवू लागले. अनुराधा यांनी याचे कारण आत्ताच्या आत्ताच्या चित्रपटातील बदललेल्या गाण्यांचे स्वरूप असे सांगितले होते. अनुराधा पौडवाल यांनी असेही म्हटले होते की, “यापूर्वी असे चित्रपट बनत होते, ज्यात संगीताला महत्त्व दिले जात होते. पण नंतर सर्व काही बदलले.” त्यामुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये गाणी न गाण्याचा निर्णय घेतला आणि त्या केवळ मराठीतील भजन व भक्तीगीतांमध्ये रमू लागल्या.
दरम्यान, अनुराधा यांनी त्यांच्या आजवरच्या संगीत कारकिर्दीत अनेक लोकप्रिय गाणी गात रसिक श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. अनुराधा पौडवाल यांनी हिंदीसोबतच बंगाली, कन्नड आणि तेलगू भाषांमध्येही गाणी गायली आहेत. २०१७ मध्ये, भारत सरकारनं अनुराधा पौडवाल यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं आहे.