Sameer Wankhede Big Statement : २०२१ हे वर्ष शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप वाईट होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. जामीन मिळण्यापूर्वी आर्यन खानने २५ दिवस तुरुंगात काढले आणि नंतर आर्यनला त्याच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यावेळी समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते. त्यांनीच तपास करुन आर्यन खानला अटक केली. आता अलीकडेच, समीर वानखेडेने त्याच्याविरोधात चालवलेल्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिली. शाहरुख खान बरोबरच्या लीक झालेल्या चॅट आणि आर्यनला सोडण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपांवर आता समीर यांनी थेट प्रतिक्रिया दिली.
NEWJ शी बोलताना समीरला विचारण्यात आले की, सुपरस्टारच्या मुलाला अटक केल्यामुळे मीडियाने त्याला टार्गेट केले आहे का?. यावर वानखेडे म्हणाले, “मला टार्गेट करण्यात आले असे मी म्हणणार नाही. तर मी खूप भाग्यवान आहे असे म्हणेन कारण मला मध्यमवर्गीयांचे प्रेम मिळाले आहे. त्यांना असे वाटते की कोणी कितीही मोठा असला तरी प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत. मला कसलाही पश्चाताप नाही. मला पुन्हा संधी मिळाली तर मी तेच करेन”.
शाहरुख खानच्या चॅटबाबत विचारले असता, समीर वानखेडे यांनी थेट उत्तर दिले नाही. न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले असल्याने यावर बोलू शकत नसल्याचे समीरने सांगितले. मात्र समीरने शाहरुखच्या चॅट लीक केल्या नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, “मी इतका कमकुवत नाही की मी गोष्टी लीक करेन”. शाहरुख आणि आर्यनला पीडित म्हणून दाखवता यावे यासाठी हे जाणूनबुजून केले जात असल्याचे त्याला विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “ज्याने हे केले त्याला मी सांगेन की कृपया आणखी प्रयत्न करा”.
आर्यनला सोडवण्यासाठी २५ कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाला समीर वानखेडेनेही उत्तर दिले. ते म्हणाले, “मी आर्यनला सोडले नाही, उलट मी त्याला धरले. खटला कोर्टात सुरु असून देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे”. समीर वानखेडे यांच्या टीमने आर्यन खानला त्रास दिल्याच्या आरोपावर ते म्हणाले, “मी कोणत्याही मुलाला अटक केली असे मला वाटत नाही. वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंग यांनी देशासाठी प्राण दिले. तुम्ही त्याला मूल म्हणू शकत नाही”.