Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ च्या घरात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. नुकताच समोर आलेल्या ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये टास्कदरम्यान तन्वी, विशाल आणि दिपाली सय्यद यांच्यात जोरदार वाद झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, आजच्या भागात मोठा ड्रामा पाहायला मिळणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये तन्वीचा संताप अनावर झालेला दिसतो. टास्कदरम्यान ती म्हणते, “पाठीमागून खंजर खुपसतात ना, म्हणून काही लोक एकटेच असतात.” तन्वीच्या या वक्तव्यावर घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावर सोनाली राऊत थेट प्रत्युत्तर देताना म्हणते, “हे सगळं तुझ्या नेचरमुळेच तुझ्यासोबत होतं.” सोनालीच्या या बोलण्यामुळे तन्वी अधिकच चिडलेली दिसते. ती घरातील सर्व सदस्यांकडे पाहत बोलते, “इथेच सगळ्यांना सांगते, माझ्या कॅरेक्टरवर जायचं नाही.” तन्वीच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळतो.
आणखी वाचा – “आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं”, अजित दादांच्या चितेजवळ डोकं ठेऊन रडला सूरज; म्हणाला, “मला सोडून…”
यानंतर दिपाली सय्यद देखील तन्वीवर निशाणा साधताना म्हणते, “तू काय करतेस, ते सगळ्यांना माहिती आहे.” दिपालीच्या या वक्तव्यामुळे तन्वीचा संयम सुटल्याचं दिसतं. याच वादात विशालही तन्वीवर संताप व्यक्त करताना दिसतो. त्यामुळे घरातील अनेक सदस्य एकाच वेळी तन्वीविरोधात उभे राहत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सर्व सदस्यांचा विरोध एकाचवेळी सहन न झाल्यामुळे तन्वी अधिकच आक्रमक होते आणि ती सर्वांवर ओरडताना दिसते. या संपूर्ण प्रकारामुळे ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा झाल्याचं स्पष्ट होत आहे. आता तन्वीचा हा संताप घरातील समीकरणं बदलणार का? या राड्याचा परिणाम पुढील खेळावर कसा होणार? आणि घरातील सदस्यांमधील दरी आणखी वाढणार का? हे सर्व पाहणं आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.





