Nilesh Sable On Sharad Upadhye : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने आजवर अनेकांना हसवलं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढविली. प्रत्येकवेळी या शोच्या सेटवर कलाकारांची विशेष काळजीही घेतलेली पाहायला मिळाली. या शोच्या सूत्रसंचालनाची, दिग्दर्शनाची धुरा डॉ. निलेश साबळे यांनी सांभाळली. सध्या डॉ. निलेश साबळे आणि सुप्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये यांचा वाद सोशल मीडियावर रंगत आहे. शरद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निलेश यांच्यावर अनेक आरोप केले, दरम्यान आता निलेश यांनी शरद यांच्या प्रत्येकाला आरोपाला सडेतोड उत्तर दिलं आहे. निलेश यांनी पोस्टद्वारे व्हिडीओ शेअर करत त्यांना थेट सवाल केला आहे.
शरद उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं, “मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वाजता पोहोचलो पण तीन वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते”. शरद यांच्या या मुद्द्यावर निलेश यांनी भाष्य करत थेट सवाल केला आहे. निलेश म्हणाले, “निलेश साबळे यांनी सेटवर अपमान केला असं तुम्ही म्हटलं, तर मला सांगायचं की, २०१५-२०१६चा हा काळ आहे. त्यामुळे तेव्हा कार्यक्रमाचे फक्त ५० भाग झाले होते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे १० वर्ष डोक्यात हवा गेली होती हे वाक्य वेगळं वाटतं. पण मला एवढंच सांगायचं होतं की, तुम्ही सोशल मीडियावर ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, जसं की, मला सेटवर बोलावलं, पाणीही विचारलं नाही”.
पुढे त्यांनी म्हटलं, “मला सगळ्यांना सांगायचं आहे की, essel vision ची कंपनी हा चला हवा येऊ द्याचा हा कारभार पाहते. जे जे लोकं या शोला येऊन गेले आहेत त्या सगळ्यांना विचारा. क्लासिक स्टुडिओची सगळ्यात मोठी रुम ही शरद उपाध्ये सरांना देण्यात आली होती. प्रत्येक मेकअप रुममध्ये पाण्याच्या बाटल्या या ठेवलेल्या असतात. पाणी विचारलं नाही का?, ही खरंच माझी जबाबदारी असेल का? हा प्रश्न मला अजूनही पडला आहे. कारण मी स्टेजवर होतो”.
शेवटी त्यांनी म्हटलं की, “आता तुम्हाला पाणी मिळालं नाही याला मी जबाबदार आहे का यावरुन मी अजूनही कोड्यात आहे. या शोचा मी निर्माता नाहीच आहे, म्हणून मी त्या निर्मिती संस्थेला दोष देत नाही, त्यांची कार्यपद्धती मी तुम्हाला सांगितली आहे. आदल्या दिवशी याबाबत बोललं जातं”.





