बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले. दीर्घकाळ ते कर्करोगाशी झुंज देत होते. ‘मदर इंडिया’ या चित्रपटात साजिद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करमध्ये नामांकनही मिळालं होतं. साजिद खान यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा समीर याने दिली. साजिद खान यांच्या निधनाची बातमी बुधवारी समोर आली. त्यानंतर काही लोकांना असे वाटू लागले की, दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन झाले आहे. दोघांचे नाव एकच असल्यामुळे लोकांचा गैरसमज झाला होता. (Director Sajid Khan Video)
यावर स्वतः साजिद खान यांनी हा गैरसमज दूर केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. साजिद खानने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, “ज्या व्यक्तीचे निधन झाले ते अभिनेते साजिद खान होते”. व्हिडीओ शेअर करताना साजिदने असं लिहिले आहे की, “RIP साजिद खान (१९५१ -२०२३ ) मी नाही. काही लोकांनी माझ्या फोटोसह हा संदेश दिला आहे”.
प्रेक्षकांचा गैरसमज दूर करण्यासाठी साजिदने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “मी भूत आहे, मी साजिद खानचं भूत आहे. मी तुम्हा सर्वांना खावून टाकेन. माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही. मला शांती कशी मिळेल? तो साजिद खान ७०च्या दशकातला होता. १९५७मध्ये आलेल्या ‘मदर इंडिया’मध्ये साजिद खानने साकारलेल्या लहान मुलाचे नाव सुनीत दत्त होते. त्यांचा जन्म १९५१ मध्ये झाला. माझा जन्म २० वर्षांनंतर झाला. त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पण मीडियाच्या काही बेजबाबदार लोकांनी माझा फोटो पोस्ट केला आहे”.
साजिद पुढे म्हणाला, “काल रात्रीपासून मला लोकांकडून मेसेज येत आहेत, रेस्ट इन पीस. लोकांचे फोन येत आहेत की, तू जिवंत आहेस ना? अहो भाऊ, मी जिवंत आहे. तुमच्या प्रार्थनेमुळे मी मेलो नाही. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की हा व्हिडीओ जो कोणी पाहत आहे तर मी जिवंत आहे. ईश्वर त्या साजिद खानच्या आत्म्याला शांती देवो” असंही साजिद खान म्हणाला आहे.