अलीकडे एखाद्या गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा सीक्वेल येणं ही काय नवीन गोष्ट नाही. हिंदीसह मराठीमधील अनेक चित्रपटांचे आजवर अनेक सीक्वेल आले आहेत. लवकरच सचिन पिळगांवकरांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या सुपरहिट चित्रपटाचाही सीक्वेल येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग आणि डबिंग संपून लवकरच हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर यांनी नुकताच रेडिओ सिटीशी संवाद साधला. या संवाददरम्यान् त्यांना अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचा दूसरा भाग येणार का? असं विचारण्यात आले, यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल त्यांनी स्पष्ट नकारच दिला.
सचिन पिळगांवकर यांनी याबद्दल बोलताना असं म्हटलं की, “नाही, नाही… त्याचे कारण हे आहे की, आता लक्ष्या नाही आहे. त्याच्याशिवाय काही बनू शकत नाही. फक्त लक्ष्याच नाही असं नाही तर सिद्धार्थ रे नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस (लेखक), अरुण पौडवाल (संगीतकार), शांताराम नांदगावकर (गीतकार) हेदेखील नाही आहेत. असे अनेक लोक आहे जे या चित्रपटात होते. ज्यांनी या चित्रपटासाठी योगदान दिले आहे. ही मंडळी नाही आहेत, तर हा चित्रपट कसा काय पुढे घेऊन जाणार? त्यामुळे त्याला न हात लावलेला केव्हाही बरं.
यापुढे पिळगांवकरांनी असं म्हटलं की, “काही काही गोष्टी अशा असतात, ज्या माणसाच्या हातात नसतात, त्याच्या पलीकडच्या असतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट. हा चित्रपट मी बनवला आहे, असं मी बोलूच शकत नाही, तो चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला आहे आणि मग त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे”.
आणखी वाचा – अरमान मलिकची पत्नी पायल मलिक पुन्हा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये येणार?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ‘तुम्ही दिलेले सत्तर रुपये वारले’, ‘हा माझा बायको पार्वती’ हे आणि असे अनेक संवाद आहेत ज्यांनी मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही हे संवाद अनेकांच्या तोंडपाठ आहेत. १९८८ साली आलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फळी होती. यातील अनेक कलाकार आज आपल्यात नाहीत, मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत हे नक्की.