“आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग, सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायाचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कुणाशी तरी आघाडी करुन विकलात की तुम्ही हा भगवा रंग”, या संवादाने संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. अर्थात हा संवाद त्याच चित्रपटातील ज्याची साऱ्या प्रेक्षक वर्गामध्ये उत्सुकता लागून राहिली होती. हा सिनेमा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘धर्मवीर २’. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर अनावरण सोहळा अगदी दिमाखात पार पडला. काही दिवसांपूर्वी आलेल्या या चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली होती. (Dharmaveer 2 Trailer)
‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याला बॉलिवूड कलाकार मंडळींसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीही उपस्थिती दर्शविली. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांनी हजेरी लावली. अगदी दिमाखात हा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झालेला पाहायला मिळाला.
दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल येत असून त्यासाठीही प्रेक्षक उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदुत्वाच्या न्यायासाठीचा लढा पाहायला मिळत आहे. दिघे साहेबांनी अन्यायाविरोधात न्याय कसा मिळवून दिला याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली.
‘धर्मवीर २’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘झी स्टुडिओज’ आणि ‘साहील मोशन आर्ट्स’ या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.