Ankita Walavalkar And Dhananjay Powar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात सर्वच स्पर्धकांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. या पर्वात विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. या पर्वाच्या विजेतेपदावरही सूरज चव्हाण या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने नाव कोरलं. तर धनंजय पोवार, अंकिता वालावलकर या रील स्टारनेही पहिल्या पाच क्रमांकामध्ये नंबर पटकावला. या पर्वातील धनंजय पोवार व अंकिता वालावलकर या दोघांचे भावा-बहिणीचे नाते पाहायला मिळाले. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना आणि घराबाहेर आल्यानंतरही दोघांचे नाते फुलताना दिसले.
अंकिताला ‘बिग बॉस’नंतर डीपीला भेटता आलं नव्हतं म्हणून ती काही दिवसांनी डीपीला भेटायला नवऱ्यासह गेली. वेळात वेळ काढून अंकिताने कोल्हापूर गाठलं आणि धनंजयची भेट घेतली. अंकिता व धनंजय यांची मैत्री ही ‘बिग बॉस’च्या घरात येण्याआधी पासूनची आहे कारण दोघंही पेशाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. एका क्षेत्रात काम करत असल्याने डीपी व अंकिता यांची बऱ्यापैकी एकमेकांशी ओळख होती. दोघांनी अगदी दणक्यात भाऊबीजही साजरी केली.
यानंतर आता अंकिता मतदानानिमित्त कोकणात तिच्या घरी गेली आहे. कोकणात गावी असताना डीपी मुंबईत आला. मुंबईत येऊन डीपीने कुणालची भेट घेतली. अंकिता नसल्याने डीपी व कुणालने एकत्र धमाल केली आणि अंकिता व्हिडीओ कॉल करुन डिवचलं. डीपी व्हिडीओ कॉलमध्ये असं बोलताना दिसत आहे की, “मी कुणालला कॉल केला, तेव्हा तो मला म्हणाला हडळ गावाला गेली आहे तुम्ही इकडे या. मी चेटकीण बोललो पण तो हडळवर आला”. यावर कुणाल हात जोडताना दिसत आहे.
डीपी बोलताना दिसत आहे की, “आम्ही खूप मजेत वेळ घालवत आहोत. मुंबईतील हडळ कोकणात गेल्यानं मुंबईत दोन महापुरुष स्वतंत्र राहत आहेत”, असं बोलून तो अंकिताला चिडवत आहे. अंकिता व कुणाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनीही सोशल मीडियाद्वारे प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.