‘आमचं ठरलं’ म्हणत सिनेसृष्टीत अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक लोकप्रिय जोड्यांनी लगीनगाठ बांधत शाही थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा उरकला. तर काहींनी थेट त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तर काहींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अशातच आणखी एका कलाकार जोडीने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे. (Kiran Gaikwad And Asmita Deshmukh)
“ए फेब्रुवारी आहे. आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का” असं हटके कॅप्शन देत अभिनेता किरण गायकवाडने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. अभिनेता किरण गायकवाडने अभिनेत्री अस्मिता देशमुखला पुष्पगुच्छ देतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली त्याने आता सांगायचं का सगळ्यांना असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे किरण व अस्मिताही रिलेशनशिपमध्ये आहेत का? हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे.
ही पोस्ट शेअर करताच किरण व अस्मिताच्या चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अभिनेत्रींच्या बहिणीने रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला पाहायला मिळत आहे. अस्मितेची बहीण ज्ञानेश्वरी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन किरण व अस्मितेची पोस्ट शेअर करत,”अभिनंदन लव्ह बर्ड्स. तुमच्यासाठी खूप आनंदी आहे” असं म्हणत ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. तर काहींनी ही पोस्ट पाहता हे प्रमोशन असल्याची शक्यता वर्तविली आहे.

‘देवमाणूस’ या मालिकेने निरोप जरी घेतला असला तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेत किरण व अस्मिता यांना एकत्र छोटया पडद्यावर पाहणं रंजक ठरलं. या मालिकेतील डिम्पल या भूमिकेमुळे अस्मिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या अस्मिता ‘तुझी माझी जमली जोडी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर किरणने आजवर विविध मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली.