Hemlata Patkar Arrest : मराठी सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी मराठी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला अटक केली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकेकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक केली आहे. हेमलता पाटकर आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस यांना अटक करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटक झालेल्या आरोपींपैकी हेमलता पाटकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं असून, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा – “कधीच सूनेसारखं वागवलं नाही…”, सासूच्या निधनानंतर अमृता देशमुख भावुक; म्हणाली, “प्रसाद आणि पप्पा…”
‘गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपी’ या नावानं व्यवसाय करणाऱ्या एका महिला उद्योजिकेने आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी गोरेगावच्या आंबोली परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीनंतर पहाटे सुमारे २.४० वाजता, उद्योजिकेचा मुलगा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत लिफ्टने खाली उतरत असताना एक महिला लिफ्टमध्ये शिरली. बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून या महिलेत आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता. वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकेच्या मुलावर खोटे आरोप करत संबंधित महिलेनं आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होताच हेमलता पाटकर आणि अमरीना असं नाव सांगणाऱ्या दोघींनी बांधकाम व्यावसायिकेला आणि मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दहा कोटींची मागणी केली. तडजोडीनंतर ५.५ कोटी रुपये देण्याचं ठरलं, मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे संशय आल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकेने गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी लोअर परळ येथे खंडणीच्या रकमेतील दीड कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिसांनी दोघींनाही रंगेहाथ पकडले. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडून सुरू असून, आणखी कोणाची सहभागिता आहे का?, याचा तपास घेतला जात आहे.





