hemlata bane extortion case : मराठी सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली की, मराठी अभिनेत्रीला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. गोरेगांव येथील बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटी खंडणी मागितल्याचा आरोपावर अभिनेत्रीला अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींपैकी हेमलता पाटकर ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं असून, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मधील ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचं सांगितलं जात आहे.
हेमलताला अटक केल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कांचन देशमुख म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यादेखील चर्चेत आल्या. आणि याप्रकरणी अर्चना पाटकर यांनी सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. “माझा मुलगा हेमलता बाणेपासून ४ वर्षांपूर्वी विभक्त झाला आहे” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आणि “घटस्फोटाची केस सुरु असल्याने आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही”, असंही अर्चना यांनी स्पष्ट केलं आहे.
अर्चना पाटकर यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं, “मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली ४० वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण, सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की, माझा मुलगा ४ वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे”.
शेवटी त्यांनी म्हटलं, “कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरु आहे म्हणून मी यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करु नका. धन्यवाद!”. अर्चना यांनी शेअर केलेल्या पोस्टवर आता चाहते देखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.





