‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरच्या अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली. सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे तिच्या पायाच्या फ्रॅक्चरवर उपचार सुरु होते. यावेळी तिने घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम होऊ लागले. या उपचारादरम्यान तिच्या शरीरात द्रवपदार्थ तयार होऊ लागले, ज्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला.
सुहानीच्या निधनाचे वृत्त येताच मनोरंजन सृष्टीतून अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले. अशातच आता अभिनेत्रीची आई-वडिलांची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे. सुहानीच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीच्या शेवटच्या दिवसातील आरोग्याच्या संघर्षांबद्दलची परिस्थिती सांगितली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुहानीच्या वडिलांनी सांगितले की, “दोन महिन्यांपूर्वी जेव्हा तिला हाताला सूज येऊ लागली होती. वैद्यकीय उपचार सुरू असूनही एम्समध्ये दाखल होईपर्यंत तिचा आजार अज्ञात राहिला. तिच्या वैद्यकीय चाचण्यांवरून असे दिसून आले की ती ‘डर्माटोमायोसिटिस’ या दुर्मिळ स्वयंप्रतिकार विकाराने ग्रस्त होती”.
यापुढे त्यांनी असे सांगितले की, ‘डर्माटोमायोसिटिस’ या दुर्मिळ आजारवर उपचार फक्त स्टिरॉइड्सने केला जाऊ शकतो. दुर्दैवाने, स्टिरॉइड्सने तिची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आणि तिची फुफ्फुसे कमकुवत झाली. त्यामुळे तिच्या शरीरात द्रवपदार्थ जमा झाले. यामुळे तिला श्वास घेणे कठीण झाले आणि अखेर १६ फेब्रुवारीच्या संध्याकाळी सुहानीचा मृत्यू झाला.”
यावेळी तिच्या आई-वडिलांनी सुहानीला लहानपणापासूनच चित्रपटाची आवड असल्याचे सांगितले. “सध्या ती जनसंवाद आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत होती आणि ती या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला तिचा अभ्यास पूर्ण करायचा होता आणि नंतर चित्रपटात कामही करायचे होते” असं तिची आई म्हणली.
दरम्यान, सुहानीच्या निधनाचे वृत्त कळताच कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी व तिच्या चाहत्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली. आमिर खाननेदेखील सुहानीच्या निधनावर ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले होते.