Actor Atul Parchure Died : मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. १५ ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर फक्त सिनेविश्वातीलच नाही तर, अनेक राजकीय मंडळींनी देखील दुःख व्यक्त केलं. नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. आज हा हरहुन्नरी कलाकार आपल्यात नसल्याचं दुःख साऱ्यांना होतं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवत अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांचं सांत्वन केलं आहे.
अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी कळताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की, “अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर प्रचंड दुःख झालं. अशा झालेल्या काही नुकसानामुळे कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून अतुल परचुरे यांच्या कामाचं कौतुक केलं. शिवाय मराठी व हिंदी सिनेविश्वातील त्यांच्या अमुल्य योगदानाला कधीही विसरता येणार नाही”, असं म्हणत त्यांनी कुटुंबाचंदेखील सांत्वन केलं.

पुढे त्यांनी असंही लिहिलं आहे की, “अतुल परचुरे यांचं कार्य व विचार कायम कुटुंबाला प्रेरणा देत राहिल. या कठीण प्रसंगी कायम त्यांच्याबरोबर असलेल्या आठवणी कुटुंबासाठी आधार आहेत. त्यांना देखील कुटुंबाची, मित्रांची व चाहत्यांची आठवण येत असेल पण ते कायम आपल्या हृदयात असतील, असं देखील मोदी म्हणाले. शिवाय या कठीण काळात देव त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली.
अतुल यांना २०२२ साली यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. कर्करोगावर मात करुन ते बाहेर आले होते. मराठी चित्रपटरसिकांनी तसेच परचुरे यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. उपचारानंतर ते बरेदेखील झाले होते. गंभीर आजारपणातून बरे होतं अभिनेते अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलेलं पाहायला मिळालं होतं.