‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या विशेष चर्चेत आहे. अशातच आज त्याचा वाढदिवस आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. अशातच त्याच्या वाढदिवसानिमित्तही अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सूरज चव्हाणचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे आणि हा चाहतावर्ग त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील त्याची लाडकी ताई म्हणजेच अंकिता वालावलकरनेही सूरजला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिता वालावलकरने त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असून या संभाषणाचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. (Ankita Walawalkar Wished Suraj Chavan)
अंकिताने सूरजला फोनद्वारे शुभेच्छा दिल्या असून या संभाषणात ती त्याला असं म्हणते की, “कुठे आहेस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला फोन करत आहेत तर तुझी काही लोक फोन उचलून ठेवून देत आहेत. त्यांना फोनवर मी सांगितलं की, मी तुझ्या गावी येत आहे तर ते मला आता नका येऊ, उद्या या असं काही तरी सांगत आहेत. तू बोलतो ये पण तुझी माणसे बोलतात नका येऊ मग कधी यायचं तुझ्या गावी”. यावर सूरज तिला असं म्हणतो की, “ये ना तू… कधी येणार आहेस तू?” मी दिवाळीपर्यंत गावीच आहे”. यावर अंकिता पुन्हा त्याला असं म्हणते की, “तुझा कोणता तरी नीट फोन नंबर तरी दे. कुणाला फोन करावा काहीच कळत नाही.” यावर सूरज तिला असं म्हणतो की, “मी आताच नवीन मोबाइल घेतला आहे तर त्यात सीम कार्ड टाकून माझा नंबर चालू करतो आणि मग तुला देतो”
आणखी वाचा – गप्पा सुरु असतानाच ओरीने रणवीर सिंहचा ओढला चष्मा, अभिनेत्याचा चेहऱ्याचा बदलला रंग, केलं असं काही की…
यापुढे अंकिता त्याला असं म्हणते की, “तुझा कोणता नंबर असेल तो मला दे. मी थेट तुझ्याशीच बोलेन. तुझा फोन जे कोण घेतात ते नीट बोलत नाहीत”. यावर सूरज तिला असं म्हणतो की, “जाऊदे ताई, ते नाय बोलले तरी मी आहे ताई”. त्यानंतर सूरज अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल गंमतीत असं म्हणतो की, “दाजींना सांग माझी गाणी नीट म्हणा नाही तर तिथे येऊन बुक्कीत टेंगूळ मारेन. तुला आला आहे माहीत आहे ना”. यावर अंकिताही त्याला असं म्हणते की, “दाजी तुझे म्हणणे ऐकत आहेत. करतील ते तुझी गाणी नीट”.
आणखी वाचा – ऐश्वर्या रायच्या आयुष्याशी निगडीत पाच रहस्य, याच कारणांमुळे सासरच्या मंडळींनी सोडली अभिनेत्रीची साथ?
दरम्यान, बिग बॉस’च्या अंकिता आणि सूरजचे एक खास नाते पाहायला मिळाले होते. सूरजने अंकिताला बहीण मानले असून त्यांच्यातील भाऊ-बहीणीच्या खास नात्याचे वेळोवेळी दर्शन झाले आहे. अशातच सूरज व अंकिता यांच्या गोड संभाषणाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.