साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवीची मुलगी श्रीजा कोनिडेलाचे पहिले पती सिरीष भारद्वाज यांचे निधन झाले आहे. सिरीष काही दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. फुफ्फुसाच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व प्रयत्न करुनही त्यांच्या आजाराचे निदान करण्यात अपयश आले. बुधवार १९ जून रोजी सकाळी रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (chiranjeevi son in law death)
अभिनेत्री श्री रेड्डी हिने सिरीष भारद्वाज यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीने फेसबुक व ट्विटरवर (आता एक्स) एक छायाचित्र शेअर करुन ही दुःखद बातमी दिली आहे. श्री रेड्डी यांनी ही निधनाची बातमी कॅप्शन देत लिहिली आहे की, “सिरीष भारद्वाज आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शिरीष भारद्वाज तू आम्हा सर्वांचा विश्वासघात केलास”.
चिरंजीवीची मुलगी श्रीजा कोनिडेलासह सिरीष भारद्वाज यांनी २००७मध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. दोघे कॉलेजमध्ये भेटले होते आणि नंतर बरेच दिवस त्यांनी एकमेकांना डेट केले होते. जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा श्रीजा फक्त १९ वर्षांची होती आणि सिरीष २२ वर्षांचे होते. हा विवाह आर्य समाज मंदिरात पार पडला. २००९ मध्ये, श्रीजा व सिरीष यांची मुलगी निवृत्ती यांचे निधन झाले. लेकीच्या मृत्यूनंतर त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ लागली.
२०११ मध्ये श्रीजाने दावा केला होता की, तिचे सासरचे लोक हुंड्याची मागणी करत होते. पती-पत्नीमध्ये खूप भांडण झाले. त्यानंतर श्रीजाने सिरीष व तिच्या सासूविरुद्ध छळाचा गुन्हाही दाखल केला होता. अखेर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर, २०१६मध्ये श्रीजाने बेंगळुरूमध्ये एका शानदार सोहळ्यात उद्योगपती कल्याण देव यांच्याशी लग्न केले. २०१८ मध्ये त्यांना नविष्का नावाच्या मुलाला जन्म दिला. मात्र, आता हे नातेही तुटले असून दोघेही वेगळे राहतात, असे बोलले जात आहे.