मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता चिन्मय मांडलेकर. चिन्मयने आजवर त्याच्या विविधांगी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनयाशिवाय चिन्मयने लेखक, दिग्दर्शक व निर्माता या भूमिकाही सांभाळल्या. काही दिवसांपासून चिन्मय मात्र त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याला त्याच्या मुलाच्या नावावरुन नेटकरी ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी नेहा जोशी हिने भाष्य केलं होतं. त्यांनतर आता सततच्या या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मयने आता स्वतः एक व्हिडीओ बनवत मोठा निर्णय घेतला आहे. (Chinmay Mandalekar On Trolling)
चिन्मयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत स्पष्टच मांडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत चिन्मय म्हणाला, “नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी एक अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. काल माझ्या पत्नी नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. माझ्या मुलाच्या जहांगीर या नावावरुन आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या, अश्लाघ्य अशा कमेंट्सवर हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा या कमेंट्स काही कमी झाल्यात का? तर अजिबात नाही. खरं तर त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे; पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरुन कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरुन मी यापूर्वी बोललो आहे. जर कोणाला हे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर त्यांनी ते व्हिडीओ जाऊन पाहावेत. काल नेहानंसुद्धा जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा त्याची कारणमीमांसा केली म्हणून ती करण्याकरिता मी आता वेळ वाया घालवणार नाही”.
पुढे तो असंही म्हणाला की, “मला इतकंच सांगायचंय. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का?, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झाला आहे. आज तो ११ वर्षांचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होतं आहे. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो, मी ही भूमिका करणार नाही. कारण मी करीत असलेलं काम, मी करीत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून व एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे”
यापुढे तो म्हणाला, “मला याचं वाईट वाटतंय का?, तर हो मला खूप वाईट वाटत आहे. कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे. त्याच भक्ती आणि श्रद्धेची एक अभिव्यक्ती म्हणजे माझी भूमिका होती आणि वैयक्तिक आयुष्यात खूपशा अशा गोष्टी आहेत. अगदी माझ्या गाडीतसुद्धा जिथे लोक साधारणपणे गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही आहे हे प्रेम, ही श्रद्धा आहे. पण, आपल्या श्रद्धेचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं? आणि लोकांनी तरी ते का ऐकावं. त्यांना काय दिसतं, तर मुलाचं नाव जहांगीर ठेवलं”.
“माझं एकच म्हणणं आहे, माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे खटकतंय; मग ‘जहांगीर आर्ट गॅलरी’चं नाव बदलणार आहात का? जहांगीर नावाच्याच माणसाला आपल्या देशानं ‘भारतरत्न’ दिलाय. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा -जेआरडी टाटा. त्या जेआरडी टाटांनी उभी केलेली ‘एअर इंडिया’ ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो आणि त्यांनी उभ्या केलेल्या अनेक उद्योगांचा फायदा भारतातील प्रत्येक नागरिकाला होतो. त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का?, टायटनच्या घड्याळांपासून जे लोक त्यांच्याकडे काम वगैरे करतात., त्यांच्याबाबत आपण विचार नाही करत की, याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं”.
पण ठीक आहे; मी एक अभिनेता आहे. अभिनेते नेहमीच एक सॉफ्ट टार्गेट असतात. इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की, अनेक लोकांनी त्या ट्रोलिंगमध्ये असंही म्हटलेलं आहे की, तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलंत. मग आता तुम्हाच्याबरोबर हे होणारच. माझं हे आव्हान आहे की, मला हे दाखवून द्यावं की, मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला आहे. मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलो किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या अधिपत्याखाली वावरलोय, असं कधीच झालं नाही. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना ज्या पॉडकास्टवरून हे सगळं सुरू झालं, त्या पॉडकास्टमध्येपण मी हे नमूद केलं होतं की, दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे. असो! या सगळ्याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही आहे”.
मोठ्या निर्णयाची घोषणा करत अखेर तो म्हणाला, “महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करु इच्छितो की, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार”.