ये पोरी इथेच खेळ नाहीतर माझी नजर चुकवून काढशील लगेच पळ… अगं थांब ना का धावते?… बघ सांगितलं ना धावू नकोस पडलीस ना आता… लागलं का? सांग ना लागलं का?… आमच्या शेजारची तीन-चार वर्षांची स्वरा आणि तिच्या आईचं हे सगळं बोलणं मी आमच्या गॅलरीत उभं राहून कौतुकाने न्याहाळत होते. स्वराला थोडसं खरचटलं म्हणून तिच्या आईने किती किती आरडाओरडा केला. त्या माऊलीचा जीव अक्षरशः कासावीस झाला. त्याक्षणी मला आठवली ती तीन-साडेतीन वर्षांची तळोजामधील हर्षिका. जिने जग पाहण्यापूर्वीच आपला जीव गमावला. तोही अगदी शुल्लक कारणावरुन… शेजाऱ्यानेच त्या निष्पाप पोरीची हत्या केली. सुटकेसमध्ये भरुन पुन्हा तिच्याच (हर्षिका) घरात ठेवंल. जिच्या पोटी हर्षिकाने जन्म घेतला आज त्या माऊलीचा जीव काय म्हणत असेल याचा विचार करणंही असह्य होतंय. आज त्याच माऊलीची काय परिस्थिती असेल हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न… (Child Murder Case)
आता दारात खेळत होतीस…कुठे गेलीस?. क्षणात नजरेआड झालीस तेव्हा वाटलं असशील इथेच खेळत. कुठे कुठे तुला शोधलं नाही…रात्रभर पाय झिजवले का तर कुठेतरी तू आम्हाला दिसशील आणि बघून घट्ट मिठी मारशील. पण प्रयत्न करुनही भेटली नाहीसच. हाकेच्या अंतरावर खेळत होती आणि कुठे गेली हे कळलंच नाही. शेवटी न राहवून पोलिसांत गेलो. खूप शोधलं, आक्रोश केला…आई म्हणून मी कमी पडले का?, मी चुकले का?, ही खंत या शोधात पाठच सोडत नव्हती. भीती गडद होत गेली. पोलीस तुला नक्की शोधतील ही एक अपेक्षा मनात ठेऊन आम्ही घरी परतलो.
आणखी वाचा – ‘बॅटमॅन’ फेम वैल किल्मरचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन, गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, कलाविश्वही हादरलं
घरी परतल्यानंतर कळालं की, तू भेटलीस… हो, तू भेटलीस…पण कायमची दूर गेलेली. त्या नराधमानेच तुला पोलिसांच्या भीतीपायी आपल्या घरात टाकलं. आम्ही तुझ्या शोधात असताना त्याने तुझा मृत जीव बॅगेत भरुन ती बॅग कधी आपल्याच घरी टाकली याचा थांगपत्ता लागू दिला नाही. हे वाईट कृत्य करुन तो बाजूला झाला खरा पण अखेर पोलिसांनीच त्याला शोधलं. त्या नराधमाने तुला आमच्यापासून कायमचं दूर केलं. काय बोलू काहीच कळत नाही आहे गं… ज्या नराधमाने तुझा जीव घेतला त्यालाही चिमुरडी मुलं आहेत. याचा पुसटसाही विचार त्याच्या मनात आला नसेल का?
त्या नराधमाच्या मुलांबरोबर खेळताना तुझे होणारे भांडण म्हणे त्याला सहन झालं नाही. लुटुपुटुची ही भांडण तुझ्या जीवावर बेततील याची कल्पनाही नव्हती. मी उगाच तुला बाहेर जाऊ दिलं का गं?… का मीच कारणीभूत आहे गं तुझ्या जाण्याला… त्या नराधमाला यातून काय मिळालं?, त्याचा हेतू साध्य झाला का?, तुला मारुन त्याचं मन भरलं का?, हे आणि असे अनेक प्रश्न सतत मनात येत आहेत. तुझ्याच वयाची त्याची मुलं, नेहमी दारापुढे घुटमळत असायची, तुमच्यातल्या छोट्या छोट्या वादात मीही डोकवायचे…पण मारुन टाकण्याइतका वाईट विचार कुणाच्याही मनात येईल असं वाटलं नव्हतं…
माणसाची वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नाही. एक बाप म्हणून त्याच्या मुलांवरील प्रेमापोटी त्याने आमच्या सोन्यासारख्या लेकीला एवढी मोठी शिक्षा द्यावी?. आता त्याच्या या वाईट कृत्याची शिक्षा त्याला होईलच पण याने माझी लेक परतणार का?… पुन्हा आई म्हणून मला हाक मारणारी माझी हर्षिका दिसेल का?. शेजारच वैरी ठरला की, माझाच निष्काळजीपणा आडवा आला… असेच असंख्य विचार आणि खंत आयुष्यभर पाठ सोडणार नाहीत इतकंच…