गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एका चित्रपटाविषयीची चर्चा सुरु होती आणि हा चित्रपट म्हणजे विकी कौशलचा बहूप्रतिक्षित ‘छावा’. नुकताच ‘छावा’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरमध्ये शत्रुंशी लढताना विकी कौशलचा रुद्रावतार पाहायला मिळाला आणि राज्याभिषेक सोहळ्याचीही झलक दिसत आहे. तसंच या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचेही दृश्य पाहायला मिळाले. याबद्दल आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक नेटकरी याबद्दल त्यांची मतं व्यक्त करत असतानाच छत्रपती संभाजी राजे यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी याविषयी दृश्याविषयी भाष्य केलं. (Chhatrapati Sambhaji Raje on Vicky Kaushal Chhaava)
यावेळी संभाजी राजे असं म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले आहेत. लेझीम खेळताना डान्सच्या स्वरुपात दाखवले आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणं काय चुकीचं नाही. पण ते गाण्याच्या स्वरुपात आपला आनंदोत्सव करत असताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं कितपत योग्य आहे? किंवा योग्य नाही? यावर चर्चा होणं आवश्यक आहे. इतिहासकारांनी, जाणकारांनी म्हणजे या विषयातलं ज्यांना ज्यांना कळतं त्या सगळ्यांनी विचारविनिमय करुन चर्चा करणं गरजेचं आहे”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “लक्ष्मण उतेकर ज्यांनी या चित्रपटासाठी ज्यांचे आयुष्य खर्ची केलं, तो एक मराठी माणूस आहे. म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं? याबद्दल त्याला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या भावनासुद्धा मी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं. की त्यात अनेक गोष्टी असू शकतात, ज्यात आपण दुरुस्ती करु शकतो”. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे.
आणखी वाचा – रॅपर Emiway Bantai चं थाटामाटात लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, कोण आहे त्याची पत्नी?
याशिवाय अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसणार आहे. ‘छावा’चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.