Chhaava Movie : विकी कौशल आणि बॉक्स ऑफिस किंवा ओटीटीवर गाजणारा चित्रपट असे समीकरण गेल्या काही वर्षात पाहायला मिळते आहे. अलीकडे विकीचा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपटही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. यातील ‘तौबा तौबा’ गाण्याने तर सोशल मीडियासह सर्वत्र कहर केला. अशातच आता विकी कधीही न पाहिलेल्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटामध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटातील त्याची वेशभूषा समोर आली होती. तेव्हापासून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Chhaava Movie Teaser)
विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना विकी कौशलने कॅप्शनमध्ये असं लिहिले आहे की, “अनबोल्ड, अतूट, अजिंक्य, साम्राज्याला आव्हान देण्याचे धैर्य”. सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित होताच अल्पावधीतच या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. अनेक लाइक्स व कमेंट्सद्वारे प्रेक्षकांकडून या टीझरला प्रेम मिळत आहे. हा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या टीझरमध्ये विकीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. विकी कौशल हा युद्धाच्या मैदानात शत्रूंशी लढताना दिसून येतोय. त्याची कधीही न पाहिलेली बाजू यात दाखवण्यात आली आहे. विकी कौशल छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे
या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीझरमध्ये पहायला मिळतंय. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर विकीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. अशातच आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
आणखी वाचा – नवऱ्यासह परदेशात राहणारी पूजा सावंत रक्षाबंधनला भावुक, म्हणाली, “मी तुमच्याबरोबर नाही आणि…”
दरम्यान, ‘छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री-२ ’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. यामध्ये विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.