Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पर्व हे सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वात एका मागोमाग एक स्पर्धक मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सततचे वाद, भांडण, हाणामारी, धक्काबुक्की, प्रेम हे सारं काही ‘बिग बॉस’च्या घरात एका छताखाली पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चं यंदाचं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. हे सर्व विशेष होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख यांने साकारली आहे. रितेशने आजवर अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मात्र तो पहिल्यांदाच एका रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी साकारताना दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात सध्या स्पर्धक मंडळी एकमेकांहून वरचढ ठरत स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टीम ए व टीम बी असे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील टीम ए ही ‘बिग बॉस’च्या या पर्वातील अग्रेसिव, रागीट, स्वतःच खरं करणारी, माज दाखवणारी टीम असल्याचा पाहायला मिळालं. तर टीम बी शांत, संयमी, समजून घेणारी टीम असल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या भाऊच्या धक्क्यावर टीम ए मधील स्पर्धकांना हवं तितकं बोललं गेलं नसल्याचं अनेकांनी मत मांडत नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. टीम ए मधील जान्हवी किल्लेकरने शिवीगाळही केली मात्र त्यावेळी बिग बॉस यांनी आवाज म्युट केलेला पाहायला मिळाला आणि हे अत्यंत चुकीचं आहे आणि तिने दिलेल्या शिवीचा तिला जाबही विचारला नाही याचं अनेकांनी दुःख व्यक्त केले.
तर एकीकडे टीम बी मधील स्पर्धकांच्या चुकल्या दाखवून टीम बी फोडण्याचा प्रयत्न बिग बॉस यांनी केल्याने ‘बिग बॉस’वर प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक मंडळींनी या बिग बॉसच्या निर्णयावर, या वागणुकीवर आक्षेप घेतलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “पुढारी, निक्की एलिमिनेशला आल्यावर एलिमिनेशन नाही. निक्की, जान्हवी बाहेर एवढ्या शिव्या खातात पण त्यांची एकपण कमेंट दाखवली नाही उलट असं दाखवलं की, ते किती चांगलं खेळत आहेत. आता बी टीममध्ये भांडणं लावून देत आहेत. म्हणजे ए वाल्यांना वाचवायचे सगळे प्रयत्न करत आहेत. एक वेळ अशी येईल की तुमचा तुमचा टीआरपी तुमच्यावरच उलटेल”, असं म्हटलं आहे.

याशिवाय “टीम ए फोडा ‘बिग बॉस’ टीम बी ला एकत्र आणण्याचा प्रयत्न करा”, “‘बिग बॉस’च गद्दारी करत आहे. टीआरपीसाठी ‘बिग बॉस’ ग्रुपमध्ये भांडण लावायचे काम करत आहे”, “पहिली गोष्ट तर विश्वातघात सारखं कोणी काही वागलं नाही आहे आणि ‘बिग बॉस’ने टीम बी फोडायचा प्रयत्न केला आहे”, “सगळया चुगल्या अंकिताच्या दाखवून तिला व्हिलन बनवत आहे. दाखवायचं तर जान्हवीची चुगली दाखवा. निक्की विषयी ती जे काही बोलली ते दाखवा. नेहमी टीम ए घाण वागणार आणि आणि शाळा फक्त टीम बी ची होणार”, अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी संताप दाखवलेला पाहायला मिळत आहे.