‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. मुलगी झाली हो मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिनं आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत तिने मुक मुलीची भूमिका साकारली होती आणि तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सध्या ती झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतूनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे तिच्या लग्नाची. अभिनेत्रीने तिच्या लग्नाची पत्रिका शेअर करत ही गुडन्यूज दिली होती. (Divya Pugoankar Kelvan)
लग्नपत्रिका शेअर केल्या नंतर आता दिव्याच्या लगीनघाईला सुरुवात झाली आहे. नुकतंच दिव्याचं केळवण पार पडलं. लक्ष्मी निवास मालिकेतील कालाकारांनी अभिनेत्रीचं केळवण मोठ्या थाटात पार पाडलं. या केळवणाचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर याच मालिकेतील दिव्याची सहकलाकार अभिनेत्री अक्षया देवधरने तिच्या केळवणाचा खास फोटो शेअर केला आहे.

“अक्षय (दिव्याचा होणारा नवरा) तुझं आमच्या कुटुंबात स्वागत आहे” असं म्हणत अक्षयाने दोघांचा खास फोटो शेअर केला आहे आणि त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हायरल व्हिडीओमधून दिव्या-अक्षय यांच्या केळवणाचा थाट पाहायला मिळत आहे. या केलवणाला लक्ष्मी निवास मालिकेतील तुषार दळवी, हर्षदा खानविलकर, निखिल राजशिर्केसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. मोठ्या आनंदात व उत्साहात हा सोहळा पार पडला.
दरम्यान, दिव्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिकेची एक छोटीशी झलक शेअर करत लवकरच ती लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं होतं. त्यामुळे आता तिच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. तर दिव्या लक्ष्मीनिवास मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे