Celina Jaitly Post : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. डॉक्टरवर बलात्कार करुन नंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातील लोक संतापले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच रस्त्यावर उतरुन सर्वजण आपला संताप व्यक्त करत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी लोकांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत होत आहे. यादरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सेलिनाने घट्ट कपडे घालण्याचे आणि थोडे पाश्चिमात्य असण्याचे परिणाम तिला भोगावे लागले असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणादरम्यान सेलिना जेटलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. लहानपणीचा फोटो शेअर करत तिने सांगितले की, ती अनेकवेळा जीवघेण्या कृत्यांना बळी पडली आहे.
सेलिनाने लिहिले की, “पीडित नेहमीच दोषी असते. माझा हा फोटो इयत्ता सहावीमधील आहे. त्यावेळी माझ्या जवळच्या विद्यापीठातील मुले माझ्या शाळेबाहेर थांबू लागली. तो रोज माझ्या रिक्षाच्या मागे यायची. मी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण अवघ्या काही दिवसांत माझ्या लक्षात आले. जेव्हा त्यांनी रस्त्यावर दगडफेक करायला सुरुवात केली तेव्हा ही गोष्ट आवर्जून जाणवली. तिथे उभे असलेले कोणीही काही बोलले नाही. या घटनेबद्दल माझ्या शिक्षिकेने मला सांगितले की मी एक अतिशय पाश्चिमात्य मुलगी आहे, जिने ना केसांना तेल लावले, ना केसांची वेणी घातली, ना सैल कपडे घातले. ही माझी चूक होती. या वयात मी अशा गोष्टींचा सामना केला ज्या मला करायला नको होत्या. एके दिवशी मी सकाळी शाळेत जाण्यासाठी माझ्या रिक्षाची वाट पाहत असताना एका माणसाने त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले. काही वर्षे या सगळ्यासाठी मी स्वतःलाच दोष देत राहिले. शिक्षक जे काही बोलले त्यामुळे माझीच चूक आहे, असे मला वाटायचे”.
सेलिना जेटली पुढे म्हणते, “मला आठवते की, मी अकरावीत होते. काही लोकांनी माझ्या स्कूटरची वायर कापली होती. कारण महाविद्यालयातील त्या मुलांना मी स्वीकारत नव्हते जे माझ्याशी गैरवर्तन करायचे आणि मला वाईट नावाने हाक मारायचे. माझ्या स्कूटरवर अश्लील नोट्स ठेवायचे. माझ्या वर्गशिक्षिकेने मला फोन करुन सांगितले की तू फॉरवर्ड टाईप मुलगी आहेस. तुम्ही स्कूटरवर येता, जीन्स घालता, केस लहान ठेवता यामुळे मुलांना वाटते की त्या मुलीचं चारित्र्य कमी आहे आणि ही नेहमीच माझी चूक आहे. मला आठवते की एके दिवशी माझ्या स्कूटरची वायर तुटल्यामुळे जीव वाचवण्यासाठी मला माझ्या स्कूटरवरून उडी मारावी लागली. या घटनेने मला खूप त्रास दिला. माझ्या स्कूटरचे नुकसान झाले. मी शारीरिक व मानसिकदृष्ट्या दु:खी होते”.
सेलिनाने पोस्टच्या शेवटी लिहिले, “माझे आजोबा निवृत्त झाले होते. त्यांनी देशासाठी दोन युद्धे लढली होती. म्हातारपणी त्यांना मला शाळेत घेऊन जावे लागले. मला अजूनही तो घाणेरडा मुलगा आठवतो. जो माझ्या मागे लागायचा. माझ्या स्कूटरचे नुकसान करायचा. माझ्या आजोबांची क्रूर चेष्टा करायचा. नानांनी त्या मुलांकडे पाहिलं आणि मान हलवली. मला ते अजूनही आठवत आहे. मी नानांचा चेहरा वाचू शकले कारण माझ्याबरोबर होते. माझ्या आजोबांना त्या लोकांबद्दल खूप द्वेष होता. आपल्या हक्कांसाठी व संरक्षणासाठी लढण्याची हीच वेळ आहे. यात आमचा दोष नाही. आणखी किती मुलींचा याच्याशी संबंध आहे?”, असा सवाल सेलिनाने केला आहे.