‘ब्रॉउन रंग’, ‘देसी कलाकार’, ‘सनी सनी’, ‘ब्ल्यू आईज्’, ‘मनाली ट्रान्स’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांवर तरुणाईला थीरकायला भाग पाडणारा गायक, संगीतकार व रॅपर म्हणजे ‘यो यो हनी सिंह. आजवर त्याने अनेक लोकप्रिय व प्रसिद्ध गाणी देत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे आणि रसिक श्रोत्यांवरील या गाण्यांची मोहिनी कायम आहे. एकेकाळी यश, प्रसिद्धी व लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या हनी सिंहचे आयुष्य व्यसनाने उद्ध्वस्त केले. तो व्यसनांच्या इतका आहारी गेला होता की, यामुळे त्याला अनेक मानसिक व शारीरिक आजारांचाही सामना करावा लागला होता. अशातच आता त्याच्या आयुष्यावर आधारित एक सीरिज आली आहे. (Honey Singh Netflix Famous documentary)
यो यो हनी सिंहची ‘फेमस’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून यात त्याच्या आयुष्यावर आधारित काही घटनांवर भाष्य करण्यात आलं आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित झाली असून १ तास २० मिनिटांच्या या माहितीपटात हनी सिंगने काहीही नवीन सांगितलेले नाही. या सीरिजमधील काही गोष्टी गोष्टी वगळता जनतेला मूर्ख बनवले गेल्याचे म्हटलं जात आहे. हनी सिंहच्या या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्या करमपुरा घरापासून ते त्याच्या टूर, मैफिली आणि मित्र आणि कुटुंब या सर्व गोष्टींबद्दल सांगितले. त्याचबरोबर हनी सिंहच्या बहिणीने त्याच्या गंभीर आजाराबद्दल आणि गायकाच्या खडतर प्रवासाबद्दल सविस्तर सांगितले आहे.
मात्र, हा माहितीपट पाहिल्यानंतर अनेकांना याट काही नवीन वाटलं नाही. शाहरुख खानबरोबरचा प्रसंग वगळता या सीरिजमध्ये तसं फार काही खास नसल्याचे मत आता व्यक्त केलं जात आहे. हनी सिंहने शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये ‘लुंगी डान्स’ हे गाणं गायलं होतं जे प्रचंड गाजलं. तेव्हा हनी सिंह आणि शाहरुख खान यांनी एकत्र टूर केली होती. याच टूर दरम्यान शाहरुखने हनी सिंहला कानाखाली मारल्याची बातमी पसरली. यावर हनी सिंह या डॉक्युमेंटरीमधून भाष्य केलं आहे.
याशिवाय या सीरिजमध्ये अशी एकही गोष्ट नाही जी जनतेला माहीत नाही. त्याचे आजारपण, त्याची गाणी, त्याचे वाद, त्याची बायको आणि घटस्फोट, सगळं काही प्रेक्षकांना माहीत आहे. या डॉक्युमेंट्रीपूर्वी त्यांनी अनेक मुलाखती दिल्या होत्या. ज्यात त्याने याबद्दल सर्व काही सांगितले होते. आणि या डॉक्युमेंट्रीमध्येही तेच आहे. त्यामुळे हनी सिंहच्या या डॉक्युमेंट्रीने त्याच्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा केली आहे