टिव्हीसह चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडणारे अभिनेते म्हणजे मनोज जोशी. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. ‘चुप चुप के’, ‘हंगामा’, ‘खट्टा मीठा’, ‘देवदास’ सारख्या चित्रपटांसह त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांत दमदार भूमिका साकारला आहे. अलीकडेच ते आयुष्यमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात दिसले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल खुलासा केला. त्यांना आलेल्या स्ट्रोकमुळे सुमारे दीड वर्षे ते अंथरुणाला खिळलेले होते. एवढंच नाही तर त्यांची दृष्टीही गेली होती, असा खुलासा केला. (manoj joshi suffered a stroke)
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोज यांनी त्यांच्या आयुष्यातील तो काळ सांगितला जेव्हा ते त्यांच्या बऱ्याच त्रासातून जात होते. संजल लीला भंसाळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हा प्रकार घडला. यादरम्यान त्यांना स्ट्रोक आला होता. मनोज सांगतात, “२००१ मध्ये मी आजारी पडलो. मला स्ट्रोक आला होता. त्यामुळे पुढिल दीड वर्ष मी रुग्णालयात बेडवरच होतो. ‘देवदास’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मी आजारी पडलो. त्यावेळी मी ४ दिवस कोमात होतो. त्या आजारात माझी दृष्टीही गेली होती. १९ दिवस मला काहीही दिसत नव्हतं. त्यामुळे हा आताचा झालेला माझा पुनर्जन्म आहे. मी रुग्णालयात होतो तोपर्यंत माझा बँक बॅलन्स शून्यावर होता. तेव्हा माझ्या पत्नीला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळी ती मला आधार देण्यासाठी शिकवण्याही घेत होती”.
मनोज पुढे सांगतात, “मला २००३ मध्ये ‘कहता है दिल’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यात मी खलनायकाची भूमिका साकारली होती. सुरुवातीला मला त्या कार्यक्रमात ४ दिवसाचं काम होतं. पण पुढे माझी भूमिका वाढत गेली. काही दिवसांनी मी त्या मुख्य कलाकारांपैकी एक बनलो. यानंतर पुढे मला ‘हंगामा’, ‘हल चल’ असे अनेक चित्रपट मिळाले. मी चित्रपट निर्माता प्रियदर्शनसहदेखील १२ चित्रपट काम केले”.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली होती. ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली कचरा सेठ ही भूमिका खूप गाजली होती.