दिव्य कुमार हे चित्रपट संगीतातलं मोठं नाव आहे. हिंदी मराठी चित्रपटांसह त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अनेक हिट गाणी गायली आहेत. दिव्य कुमार यांच्या गाण्यांवर अनेक रसिक मंडळी आजही मंत्रमुग्ध होतात. ‘सुन साथिया’, ‘जी करदा’, ‘वंदे मातरम्’, ‘मनोहारी’ यांसह अनेक गाण्यांना त्याचा आवाज लाभला आहे. आपल्या आवाजाने व सुमधुर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दिव्य कुमारने नुकतेच गायकांच्या मानधनाविषयी भाष्य केलं आहे. दिव्य कुमारने ‘एबीपी’शी खास बातचीत करताना वेगवेगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांनी गायकांच्या कार्यपद्धतीबद्दल व त्यांच्या मानधनाबद्दल भाष्य केलं.
याबद्दल दिव्य कुमारने असं म्हटलं की, “१००० कोटी किंवा ५०० कोटी रुपयांच्या चित्रपटात अनेक कलाकारांना भरपूर पैसे मिळतात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही. त्यातून मोठी रक्कम मोठे अभिनेते आणि दिग्दर्शक घेऊन जातात. जेव्हा कॉस्ट कटिंगचा विचार केला जातो तेव्हा सर्वप्रथम गायक आणि संगीतकारांचे पैसे कमी होतात. ही कलावंताची मोठी कोंडी आहे. तुमचे नाव मोठे असूनही चांगले पैसे मागितले तर तुम्हाला ते मिळू शकते, पण कधी कधी तुम्हाला सहज नकार दिला जातो”.
आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
यापुढे त्याने असं म्हटलं की, “बॉलिवूडमध्ये अशी चांगली माणसे आहेत, जी आपली काळजी घेतात, अशी माणसे कमी आहेत पण आहेत. हे लोक तुम्हाला चांगले पैसे देतात कारण ते गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत. त्यांना गाणं गाण्यासाठी मी किंवा अरिजित हवा असेल तर ते आमच्याकडूनच गाणं गाऊन घेतात आणि त्याचे चांगले पैसेदेखील देतात. अजूनही आपण आपल्या मनात एक विशिष्ट रक्कम ठरवतो की, आपल्याला इतके पैसे मिळायला हवे. तथापि, त्यातदेखील निश्चितपणे सौदेबाजी आहे. मात्र, कोणाला किती पैसे मिळाले याचा खुलासा कधीच होत नाही”.
आणखी वाचा – सुखी संसाराची २५ वर्षे! लग्नाच्या वाढदिवसाला डॉ. नेनेंकडून माधुरी दीक्षितचं तोंडभरुन कौतुक, Unseen फोटो समोर
यापुढे दिव्य कुमारने असं म्हटलं की, “आजही असे अनेक गायक आहेत ज्यांची नावं मोठी असूनही ते केवळ ५० हजार ते १ लाख रुपये कमवू शकतात. बॉलिवूडमध्ये पैसे कमावण्यासाठी गाणं गाणे खूप अवघड आहे आणि हे आजचे नाही तर ९० च्या दशकातही हे होतंच. तुम्ही लाइव्ह परफॉर्म न केल्यास, तुमची कमाईची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते. जाहिरातींचे जग बॉलिवूडपेक्षा चांगले आहे. कारण छोट्या जाहिरातींमध्ये एका ओळीच्या जिंगल्स गाण्यासाठीही ते खूप सन्माननीय रक्कम देतात. म्हणूनच जाहिरातीमध्ये गाणे हे मला आवडते”.