बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा केला. १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने लग्नबंधनात अडकले होते. १७ ऑक्टोबर १९९९ पासून ते आजपर्यंत माधुरी आणि नेने यांचा सुखाचा संसार सुरु आहे. अशातच गुरुवारी त्यांचा लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा झाला आणि यानिमित्ताने दोघांनी रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते माधुरीला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे. तसंच त्यांनी माधुरीला त्यांची ‘चिरंतन प्रेयसी’ही म्हटलं आहे. (Madhuri Dixit and Shriram Nene)
श्रीराम नेनेंनी या व्हिडीओच्या सुरुवातीला माधुरीला प्रपोज केलं असून माधुरीने त्यांना ‘हो’ उत्तर दिलं आहे. तसंच या व्हिडीओमध्ये त्यांनी माधुरीबरोबरचे काही खास क्षण शेअर केले आहेत आणि म्हटलं आहे की, “जसे कोणीतरी म्हटलं आहे की, दोन ह्रदये जे एकत्र धडधडतात. माझ्या सोबती आणि प्रिय व्यक्तीला लग्नाच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. दयाळू आत्मा आणि सर्वात सुंदर स्मितसह, सर्व मार्गांनी तू माझ्यासाठी या ग्रहावरील सुंदर स्त्री आहेस. आम्ही जवळपास आमचे अर्धे आयुष्य एकत्र घालवले आहे, आठवणी बनवल्या आहेत, जे आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आहेत आणि खूप मजाही केली आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
माधुरीनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये माधुरीने लिहलं आहे की, “२५ वर्ष प्रेम, हास्य आणि तुझ्याबरोबरच्या असंख्य आठवणी. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला अनेक कलाकार व चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, “आमची आवडती जोडी”, “असेच कायम एकत्र राहा” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, माधुरी आणि श्रीराम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर यांचा विवाह १७ ऑक्टोबर १९९९ रोजी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पारंपारिक पद्धतीने झाला. त्यानंतर माधुरीने २००३ मध्ये पहिला मुलगा अरिन आणि २००५ मध्ये दुसरा मुलगा रायनला जन्म दिला. गेले २५ वर्षे ही जोडी एकत्र राहत असून या जोडीचे नेहमीच कौतुक केलं जातं. अशातच त्यांचा हा नवीन व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.