Dharmendra Death News : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनानंतर देओल कुटुंबियांनी भाष्य केलं नव्हतं. पण नुकतेच त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक अशी पोस्ट शेअर केली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीरपणे दिली नाही म्हणून त्यांच्या अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शविली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या घराबाहेर जमा झाले होते. इतकंच नाहीतर त्यांचे चाहते धायमोकलून रडतानाही दिसले.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, “Dharam ji ❤️ ते माझ्यासाठी सर्वकाही होते. प्रेमळ नवरा, आमच्या दोन मुलींचे ईशा आणि अहाना यांचे लाडके आणि काळजी घेणारे वडील, मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी, आणि माझ्या प्रत्येक गरजेच्या क्षणी साथ देणारे. खरं सांगायचं तर, तेच माझं सर्वस्व होते. चांगल्या-वाईट काळात ते नेहमी माझ्यासोबत उभे राहिले. त्यांच्या सहज, मनमिळावू स्वभावामुळे माझ्या घरातील प्रत्येकाला ते आपलेच वाटायचे. सर्वांबद्दल प्रेम, माया आणि आपुलकी दाखवणारे”.
Dharam ji❤️
— Hema Malini (@dreamgirlhema) November 27, 2025
He was many things to me. Loving Husband, adoring Father of our two girls, Esha & Ahaana, Friend, Philosopher, Guide, Poet, my ‘go to’ person in all times of need – in fact, he was everything to me! And always has been through good times and bad. He endeared himself… pic.twitter.com/WVyncqlxK5
पुढे त्या म्हणाल्या, “सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रतिभा, लोकप्रियतेनंतरही राहिलेली त्यांची नम्रता, आणि सर्वांना जोडणारी त्यांची अपूर्व ओढ यामुळे ते एक असे अनोखे आणि महान आयकॉन ठरले, ज्यांची बरोबरी इतर कोणतेही दिग्गज करु शकले नाहीत. चित्रपटसृष्टीतील त्यांची कामगिरी आणि त्यांचा लौकिक सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. या रिकामेपणासह आता माझे उरलेले आयुष्य घालवावे लागेल”.
शेवटी त्या म्हणाल्या, “एवढ्या वर्षांच्या नात्यानंतर त्यांच्यासोबत घालवलेल्या असंख्य आठवणी… त्या आता पुन्हा पुन्हा आठवत जगण्याचा आधार बनतील”, असं म्हणत हेमा मालिनी यांनी ही पोस्ट शेअर केली यासह त्यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरचे काही खास फोटो देखील शेअर केले.





