सध्या मराठी चित्रपटांची चित्रपटगृहांमध्ये रांग लागली आहे. एकामागोमाग एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला करत आहेत. सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. कोटींच्या घरात या चित्रपटाने गल्ला जमवला आहे. यांनतर आता बरेच मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. अशातच डिसेंबर महिना प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. डिसेंबर महिना हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अधिक लक्षणीय ठरणार आहे. (Marathi Movie Release Update)
डिसेंबर महिन्यात एकाच दिवशी तब्बल चार मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. ८ डिसेंबर हा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. ‘लंडन मिसळ’, ‘एकदा येऊन तर बघा’, ‘कस्तुरी’, ‘पिल्लू बॅचलर’ हे चार चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे चारही चित्रपट एकाच दिवशी मोठा पडदा गाजवायला सज्ज झाले आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळत आहे.
जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव वेगळ्या भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकापासून प्रेरणा घेत ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे व सुनील गोडबोले हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
तर आगामी ‘पील्लू बॅचलर’ या चित्रपटाचं दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अक्षया देवधर, सायली संजीव , शिवाली परब, सविता मालपेकर, पार्थ भालेराव, अक्षय टांकसाळे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच २०१९ साली सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्कारानं गौरविलेला ‘कस्तुरी’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक विनोद कांबळे दिग्दर्शित एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा या चित्रपटासाठी सादरकर्ते म्हणून नागराज मंजुळे व अनुराग कश्यप पुढे सरसावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमात एक-दोन नव्हे तर तब्बल १५ विनोदी कलाकरांनी धम्माल केली आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार अशा लोकप्रिय कलाकारांची भली मोठी फौज आहे.
चार मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने ‘लंडन मिसळ’ फेम अभिनेता गौरव मोरेने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत म्हटलं की, “एकाच दिवशी चार चित्रपट येत आहेत. त्यामुळे आमचे हे चारही चित्रपट तुम्ही नक्की पहा” असं आव्हान गौरवने केलं आहे. आता एकाच दिवशी चार चित्रपट प्रदर्शित होणार यामुळे अर्थात प्रेक्षकांना यामुळे भरपूर पर्याय मिळणार असले तरी एकाच दिवशी इतके चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय काहींच्या अंगाशी येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमका कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.