Radhika Apte Pregnancy : मराठीसह, साऊथ आणि बॉलिवूड क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. आपल्या सशक्त अभिनयाने राधिकाने मनोरंजनाची मोठी स्क्रीन असो वा ओटीटीद्वारे मोबाइलची छोटी स्क्रीन असो, अशा सर्वच क्षेत्रात आपली मुशाफिरी केली आहे. अशातच अभिनेत्रीबद्दल एक गुडन्यूज समोर येत आहे, ती म्हणजे राधिका लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री राधिका आपटे आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १६ ऑक्टोबर रोजी ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिने उपस्थिती दर्शवली होती. तिथे तिने आपला बेबी बंप दाखवत सगळ्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. राधिकाने तिच्या या बेबी बंपच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Radhika Apte Pregnancy)
राधिकाने शेअर केलेल्या आपल्या फोटोमध्ये गरोदरपणाचा उल्लेख केला नाही. ‘सिस्टर मिडनाइट यूके प्रीमियर #lff2024’, असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती रेड कार्पेटवर चित्रपटातील कलाकारांबरोबर दिसली. यावेळी राधिकाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राधिकाच्या प्रेग्नेंसीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. तसेच अभिनेत्रीने याबाबत कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये बेबी बंप दाखवून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
राधिकाने शेअर केलेल्या तिच्या फोटोखाली अनेक बॉलिवूड व मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझ्या गुडन्यूजबद्दल अभिनंदन”, “अप्रतिम दिसत आहेस”, “खूप खूप शुभेच्छा”, “तुझं खूप खूप अभिनंदन” अशा अनेक कमेंट्सद्वारे कलाकार व चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. राधिकाच्या या प्रेग्नन्सीच्या बातमीने तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यामुळे लवकरच तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
दरम्यान, लग्नाच्या १२ वर्षांनी राधिका बाळाला जन्म देणार आहे. राधिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच श्रीराम राघवन दिग्दर्शित आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटामध्ये दिसली होती. तसंच लवकरच ती थ्रिलर सीरिज ‘अक्का’मध्येदेखील झळकणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन नवोदित लेखक-दिग्दर्शक धर्मराज शेट्टी करत आहेत.