गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे मंगळवारी झालेल्या बाप्पाच्या विसर्जनामुळे पाणावले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला सर्व गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाबरोबरच घरच्या बाप्पांनाही या दिवशी निरोप दिला जातो. अनेक सेलिब्रिटींनी यानिमित्ताने पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही घरच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी तिने तिच्या जाऊबाऊ अदिती देशमुख यांच्याबरोबर घरच्या बाप्पाला निरोप दिला. या विसर्जनचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Genelia Deshmukh Ganapati Bappa Visarjan Video)
जिनिलीया देशमुख ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती अनेक सणवारांनिमित्तही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. देशमुखांच्या घरी सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे देशमुखांनी गणेशोत्सवाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला आणि मग काल लाडक्या बाप्पाला निरोप दिला. देशमुखांच्या घरी यंदा सुनांनी घरच्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मनोभावे पूजा करून जिनिलीया आणि तिच्या मोठ्या जाऊबाई अदिती यांनी बाप्पाला निरोप दिला. जिनिलीया व अदिती यांनीही हे विसजर्नचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात रंगला अनोखा खेळ, प्राणी ओळ्खताना सूरजची झाली दमछाक, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, जिनिलिया आणि तिच्या मोठ्या जाऊबाई अदिती देशमुख यांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करुन, मूर्ती स्वत: उचलली आणि विसर्जनासाठी निघालेल्या गाडीमध्ये ठेवली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात बाप्पांना निरोप देण्यात आला. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर करताना जिनिलियाने दिलेले कॅप्शनही खूप खास आहे. जिनिलियाने असे म्हटले की, ‘दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी मूर्ती उचलताना आम्हाला प्रचंड दडपण यायचं, त्यामुळे आम्ही तसा कधी प्रयत्न केला नव्हता. पण, यावर्षी अदिती वहिनी आणि मला बाप्पाचा आवाज ऐकू आला ‘तुम्ही करू शकता’ आणि बाप्पामुळे हे शक्य झालं. गणपती बाप्पा मोरया!”
दरम्यान, जिनिलीयाने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये देशमुखांच्या घरातील सर्व लहान मुलं बाप्पाची आरती करत आहेत. मात्र यावेळी रितेश घरी उपस्थित नसल्याने तिने नवऱ्याची आठवण काढत ‘मिस यू रितेश’ असं म्हटलं आहे. जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. देशमुखांच्या घरी सगळे मराठमोळे सण उत्साहात साजरे केले जातात. जिनिलीया मूळची महाराष्ट्रातली नसली तरीही लग्नानंतर तिने मराठी संस्कृती, परंपरा आवडीने जपल्या आहेत.