बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा व अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची लवस्टोरी काही लपून राहिलेली नाही. बऱ्याचदा हे दोघं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. या वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना व विजय हे ‘लस्ट स्टोरीज २’ या बेवसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामधील या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना बरीच पसंत पडली. या सीरिजनंतर त्यांच्या नात्याबाबत बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या. आता हे दोघं लवकरच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. (Tamannah and vijay going to married soon)
‘तेलुगु सिनेमा’च्या रिपोर्टनुसार, तमन्ना व विजय लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी आता गंभीरपणे विचार करत असल्याचं समोर येत आहे. याचं कारण म्हणजे रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं की, तमन्नावर लग्नासाठी घरातून तिच्या आई-वडिलांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. यात हा पण दावा केला जात आहे की, ‘जेलर’ चित्रपटातील गाण्यात तमन्ना दिसल्यानंतर तिने पुढे कोणताच नवा चित्रपट साईन केलेला नाही. लग्नाविषयी अद्याप त्या दोघांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. पण याचवर्षी दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने लग्नाबाबत तिचे विचार मांडले होते. याबाबत बोलताना ती म्हणाली, “लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीने ही जबाबदारी तेव्हाच घ्यावी जेव्हा त्यासाठी आपण तयार असू”.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एक मुलाखतीत ३३ वर्षीय तमन्नाने हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा तिने १८ वर्षापूर्वी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा तिला असं वाटलं होतं की ती या इंडस्ट्रीत ८ ते १० वर्षेच टिकून राहू शकेल. त्यानंतर पुढे तिने ३० वर्षानंतर लग्न करून २ मुलांची आई झालेली असेल.याबाबत सांगताना तमन्ना म्हणाली, “जेव्हा मी बऱ्याच वर्षांपूर्वी काम सुरु केलं होतं तेव्हा मला बऱ्याच गोष्टी वाटायच्या. त्यातली एक म्हणजे अभिनेत्रीचं करिअर केवळ ८ ते १० वर्षेच असतं. त्यामुळे मी माझ्या आयुष्याचा हिशोब घातला होते की वयाच्या ३० वर्षापर्यंत मी काम करणं बंद करेन. त्यानंतर माझं लग्न झालेलं असेल मला दोन मुलंही असतील. मुळात मी माझ्या आयुष्यातील वयाच्या ३० वर्षांनंतरचं नियोजन केलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा मी वास्तविक आयुष्यात ३० वर्षांची झाले, तेव्हा मला कळलं की मी तर आताच जन्माला आले आहे. ही संकल्पना माझ्यासाठी पुनर्जन्मासारखीच होती. त्यानंतर मला अगदी नव्याने जन्माला आलेल्या मुलासारखं वाटायला लागलं”.
लग्नाच्या विषयी सांगताना तमन्ना म्हणाली, “मला असं वाटतं जेव्हा आपल्याला लग्न करण्याची इच्छा होईल तेव्हा आपण लग्न करायचं. लग्न एक खूप मोठी जबाबदारी आहे. हे कोणतंही सेलिब्रेशन नाही आहे. यातही खूप मेहनत असते. जसं आपण एखादं झाडं मोठं करतो, पाळिव प्राण्याला पाळतो किंवा जसं मुलाला जन्म देणं हे एक काम आहे. त्यामुळे जेव्हा आपण अशा जबाबदारीसाठी तयार असू तेव्हा नक्कीच लग्न करायला हरकत नाही. वेळ आली आहे किंवा सगळेच लग्न करत आहेत म्हणून तुम्ही लग्न करावं असं काही नाही”, असं स्पष्ट करत तिने तिचं लग्नाबाबातचं मतं मांडलं होतं. आता हे दोघं लग्नबंधनात कधी अडकणार?, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.