मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकट्या लेकाच्या अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला संपूर्ण बॉलिवूड अवतरलेले पाहायला मिळाले. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत जवळपास प्रत्येक दिग्गज मंडळी यावेळी दिसली. मात्र, या भव्य पार्टीत कंगना रणौत दिसली नाही. अशातच आता कंगनाने अंबानींच्या पार्टीत परफॉर्म करणाऱ्या कलाकारांना टोला लगावला आहे. (Kangana Ranaut On Ambani Pre Wedding)
कंगना रणौत नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट मत मांडताना दिसली आहे. अशातच आता अभिनेत्रीने देशातील सर्वात भव्य लग्नाबाबतही मत व्यक्त केले आहे. कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. भारताचा आवाज असलेल्या लता मंगेशकर यांची मुलाखत शेअर करताना कंगनाने त्यांची स्तुती केली असून त्यात कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “करोडो रुपये मिळूनही तिने कधीही लग्नात परफॉर्म केले नाही”. याचबरोबर तिने स्वतःची तुलना लता मंगेशकर यांच्याशीही केली आहे. कंगनाने मुलाखतीचा काही भाग शेअर केला आहे ज्यात लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, “तुम्ही मला पाच मिलियन डॉलर दिले तरी मी येणार नाही”.
कंगना रणौत म्हणाली, “मी खूप आर्थिक संकटातून गेले आहे, पण लता जी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांची गाणी खूप हिट आहेत. (फॅशन का जलवा, गनी बाओली हो गई, लंडन ठुमकडा, सादी गली, विजय भव) ही गाणी आमच्या नावावर आहेत. पण मला कितीही मोह झाला तरी मी लग्नात कधीच नाचले नाही”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “अनेक सुपरहिट आयटम गाणी मला ऑफर करण्यात आली होती. तसेच मी अवॉर्ड शोपासूनही दूर झाले. लोकप्रियता मिळवण्यासाठी पैशाची नाही तर मजबूत पात्र व सन्मानाची गरज आहे. आणि हे तरुण पिढीला समजून घेण्याची गरज आहे. कमावता येणारी एकमेव संपत्ती म्हणजे प्रामाणिकपणाची संपत्ती आहे”.