बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोर धरत आहेत. या चर्चांदरम्यान आता ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस एकटीनेच साजरा केला आहे. ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चनचे तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिषेक बच्चन गैरहजर असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलादेखील अभिषेक बच्चन गैरहजर होता. ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतही तो पोहोचला नव्हता आणि आता मुलगी आराध्याचा वाढदिवसही ऐश्वर्याने एकटीने सेलिब्रेट केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Aishwarya Rai Daughter Aaradhya Birthday)
अभिनेत्री ऐश्वर्या राय व तिच्या कुटुंबासाठी नोव्हेंबर महिना खूप खास असतो. या महिन्याच्या पहिल्याच तारखेला ऐश्वर्याचा वाढदिवस असतो. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तिची मुलगी आराध्याचा वाढदिवस साजरा केला जातो. तर २१ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस असतो. या सर्वच दिवसांचं निमित्त साधत ऐश्वर्याने बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. मुलगी आराध्याचा वाढदिवस आणि वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा करतानाचे हे फोटो आहेत. मात्र या फोटोंमध्ये ऐश्वर्या पती व आराध्याचे वडील अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही.
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे लवकरच लग्न करणार, थाटामाटात झालं केळवण, फोटो व्हायरल
“माझ्या आयुष्यातील सर्वांत प्रिय बाबा-आज्जा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय… माझा आत्मा… सदैव आणि त्याही पलीकडे…”, असं कॅप्शन देत ऐश्वर्याने हे खास फोटो शेअर केले आहेत. ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये आराध्याने तिच्या आजोबांच्या फोटोसमोर डोकं ठेवल्याचं पहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्यासुद्धा तिच्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून उभी आहे. तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या व आराध्या कृष्णराज राय यांच्या फोटोसमोर उभ्या असल्याचं पहायला मिळत असून एका फोटोत ऐश्वर्याची आईसुद्धा दिसत आहे. तर पुढील काही फोटो आराध्याच्या लहानपणीचे आहेत. यातील शेवटचा फोटो आराध्याच्या बर्थडे पार्टीचा आहे.
ऐश्वर्याच्या या फोटोंवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पण त्याचबरोबर अभिषेक बच्चन या सेलिब्रेशनमध्ये का सहभागी नाही, असा सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. तसंच या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी मात्र दिसून येत असल्याचं काही चाहत्यांनी निदर्शनास आणलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्याच्या वाढदिवशीही अभिषेक आणि बच्चन कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट शेअर केली नव्हती. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जात आहे