बॉलिवूड सेलिब्रिटी हे नेहमीच चर्चेत असलेले बघायला मिळतात. अनेकदा ते एकटे न दिसता नेहमीच सुरक्षारक्षकांबरोबर असलेले बघायला मिळतात. आधीपासूनच अभिनेता सलमान खानचा सुरक्षारक्षक शेरा बघायला मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमानबरोबर असलेला बघायला मिळतो. तसेच शाहरुख खानचा सुरक्षारक्षक रवी सिंहदेखील खूप वर्षांपासून बघायला मिळत आहे. मात्र अनेकांना या सुरक्षारक्षकांचा पगार किती आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याबद्दल आता सेलिब्रिटी सिक्युरिटी कंसल्टन्ट यूसुफ इब्राहिम यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सुरक्षा रक्षकांना किती पगार असतो? याबद्दल दिलखुलासपणे भाष्य केले आहे. ते नक्की काय म्हणाले? जाणून घेऊया. (celebrity bodygurad salary)
यूसुफ यांनी नुकताच सिद्धार्थ कननबरोबर संवाद साधला. यामध्ये यूसुफ यांनी सुरक्षा रक्षकांना असलेल्या पगाराबद्दल सांगितले. शाहरुख खानचा सुरक्षा रक्षक रवी सिंहला २.७ कोटी रुपये वार्षिक पगार असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. तसेच सलमानचा सुरक्षारक्षक शेरा वर्षाला दोन कोटी रुपये कमवत असल्याचेही अनेकदा बोलले गेले. यावर यूसुफ म्हणाले की, “मी तुम्हाला म्हंटलं होतं की कोण किती कमावतो? यबद्दल आम्हाला काहीही कल्पना नसते. तसेच इतके पैसे कमावणे शक्यच नाही. रवी आधी माझ्या कंपनीसाठी काम करायचा. पण मी सतत शाहरुखबरोबर राहू शकत नव्हतो त्यामुळे रवीला ही जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर रवीने ही नोकरी सोडली आणि शाहरुखचा सुरक्षारक्षक म्हणून काम करु लागला”.

तसेच पुढे तो म्हणाला की, “सलमानचा सुरक्षा रक्षक शेराचा स्वतःचा एक व्यवसाय आहे. त्याची स्वतःची सिक्युरिटी कंपनी आहे. त्याचे अजूनही काही व्यवसाय असावेत. त्यामुळे कदाचित तो अधिक कमवत असेल”. तसेच अक्षय कुमारचा सुरक्षारक्षक श्रेयस थेले १.२ कोटी रुपये पगार असल्याचे म्हंटले गेले. त्यावर यूसुफ म्हणाले की, “याबद्दल माझ्याकडे जास्त काही माहिती नाही”.
आणखी वाचा – फराह खान की कंगणा रणौत? तुझी आवडती दिग्दर्शिका कोण? श्रेयस तळपदे म्हणाला, “माझ्या मते…”
पुढे ते म्हणाले की, “महिन्याचा हिशोब बघता १० ते १२ लाख रुपये असेलही आणि नसेलही. चित्रिकरण, इव्हेंट, प्रमोशन यासाठी किती पैसे होतात याकडेदेखील पाहिले जाते. अनेक सुरक्षारक्षकांना २५,००० ते एक लाखापर्यंत पगार असतो”. गेल्या अनेक वर्षांपासून यूसुफ हे कलाकारांना सुरक्षा देण्याचे काम करत आहेत.