बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली त्याचा ‘सिंघम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. आज इतकी वर्ष उलटून गेली तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटातील सर्व गाणीदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर या चित्रपटांचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सर्वच भाग तूफान चालले आहेत. अशातच आता ‘सिंघम’चा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला असल्याची चर्चा सर्वत्र रांगली होती. (Singham Again Review)
काही दिवसांपूर्वी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा धमकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर पाहून सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आज (१ नोव्हेंबर २०२४) हा चित्रपट देशांत सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. याबरोबरच कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असणारा ‘भूल भूलय्या’चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे कोणता चित्रपट सरस ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण आता ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट नक्की कसा आहे? याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
‘सिंघम अगेन’ हा चित्रपट पोलिसांच्या विश्वाचा एक भाग आहे. यामध्ये सर्व कलाकार पोलिसांच्या भूमिकेत आहेत. अजय बाजीराव सिंघमची भूमिका साकारत आहे तर दीपिका ‘लेडी सिंघम’ची भूमिका साकारत आहे. इन्स्पेक्टर संग्राम भालेराव किंवा ‘सिम्बा’चा रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’चा वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारही दिसणार आहेत.
दरम्यान ‘बॉलिवूड बेल’ या x हँडलने ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे सांगितले असून चार स्टार दिले आहेत. तसेच अजय देवगणची एंट्री व अक्षय कुमारचे फाईट सीन याची स्तुती करण्यात आली आहे. मात्र या चित्रपटातील अर्जुन कपूरच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, तो खलनायकाच्या भूमिकेत खास जादू करू शकला नाही. दीपिकाच्या भूमिकेने सगळ्यांचे खास लक्ष वेधून घेतले आहे तर रणवीर मात्र फारशी कमाल करू शकला नाही. तसेच VFX चांगले झाले असून फाइट सिक्वेन्स अधिक प्रभावी ठरले आहेत. करीना कपूर व टायगर श्रॉफ यांच्या भूमिकादेखील प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडल्या आहेत. मात्र या सगळ्यमध्ये चुलबुल पांडे अर्थात सलमान खानचा धमाकेदार रोल बघायला मिळाला.
यावर चाहत्यांनीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “दिग्दर्शक रोहित शेट्टीने खूप कमाल केली आहे. अजयची भूमिका मस्तच आहे. अक्षयच्या रोलने देखील या चित्रपटाला ‘चार चांद’ लावले आहेत. सगळ्यांच्याच भूमिका भारी आहेत. विशेषतः सलमानची तीन मिनिटांची भूमिका खूप भाव खाऊन गेली आहे”. त्यामुळे हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो? हे पाहाण्यासारखे आहे.