Tejaswini Pandit Shared Goodnews : मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तेजस्विनीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत तेजस्विनीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. सोशल मीडियावर तेजस्विनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. एवढंच नाही तर आपल्या नव्या प्रोजक्टबद्दलही ती चाहत्यांना माहिती देत असते. चाहतेही तिच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.
अशातच आता तेजस्विनीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तेजस्विनीने मावशी झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत दिली आहे. तेजस्विनीची बहीण पौर्णिमा पुल्लन हिने आई झाल्याची गुडन्यूज दिली.तब्बल १४ वर्षांनंतर तेजस्विनी मावशी झाली आहे. दिवाळीत लक्ष्मी घरी आल्याचा आनंद तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. तेजस्विनीने पोस्ट शेअर करत, “माझ्यासाठीची सगळ्यात मोठी सगळ्यात खास आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींनी मला दिली आहे”.
पुढे तिने पोस्टद्वारे म्हटलं आहे की, “आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली. अनेक वर्ष या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षणच नव्हे तर आयुष्य देखील या कन्यारत्नाने उजळून टाकले”.
“आमच्या कुटुंबाची कथा सुफळ संपूर्ण म्हणुया?, ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय. होऊ दे खर्च. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. शुभं भवतु”, असं म्हटलं आहे. शिवाय तिच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुकाचा वर्षावही केलेला पाहायला मिळत आहे.