Marathi Bhasha Gaurav Divas : सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ‘छावा’ चित्रपटाची. हो विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा हा चित्रपट बरंच काही सांगून गेला. चित्रपट पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. विकी कौशल या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. विकी कौशलने साकारलेल्या या भूमिकेचं सगळीकडून कौतुक झालं. या कौतुकाच्या सोहळ्यात विकीने आणखी एक कौतुक करण्याची संधी सोडली नाही. आणि ही कौतुक करण्याची संधी म्हणजे विकी कौशलने मराठी भाषादिनानिमित्त सादर केलेली वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची कणा ही कविता. सध्या विकी कौशलचा मराठी कविता सादर करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावेळी विकी कौशलही तिथे उपस्थित होता. यावेळी विकी कौशलने कुसुमाग्रजांची कणा ही मराठी कविता सादर करत उपस्थितांची आणि चाहत्यांची मने जिंकली. मंचावर येत विकी म्हणाला, “खरंतर मी आज थोडासा नर्व्हस आहे. मराठीत बोलता येतं कारण दहावीपर्यंत माझं शिक्षण मराठीतच झालं आहे. दहावीत मराठीत जास्त मार्क्स मिळाले, इंग्रजीत कमी मिळाले होते. पण माझं मराठी इतकं छान नाही. त्यामुळे काही भूलचूक झाली तर मला माफ करा”.
आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ मधील अतरंगी मित्रांची ओळख, संचिताचा बॉसी स्वभाव भारी पडणार की मैत्री होणार?
पुढे तो म्हणाला, “जावेद अख्तर यांनी माझ्या आधी इथे येऊन भाषण केलं. त्यांच्यानंतर मी येऊन बोलतो आहे आणि मला मराठी कविता म्हणायची आहे त्यामुळे मी नर्व्हस आहे. मी महाराष्ट्रयीन नाही तरीही मी मराठीतून शिक्षण घेतलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिनी शिवाजी पार्क मैदानावर मला या कार्यक्रमात बोलवलं त्यासाठी मी राज ठाकरेंना धन्यवाद देतो. मी या ठिकाणी बसलो होतो आणि इतरांच्या कविता ऐकत होतो. आशाताई बसल्या आहेत त्यांनी मला विचारलं तू कविता वाचणार आहेस? तर मी त्यांना म्हटलं होय. मराठीत? मी म्हटलं हो. त्या म्हणाल्या तौबा तौबा. पण मी प्रयत्न करतो”.
पुढे विकी असेही म्हणाला की, “राज ठाकरे यांनी मला सांगितलं तुला कविता वाचायची आहे तेव्हा मी त्यांना विचारलं कुठली कविता म्हणायची आहे? त्यावर राज ठाकरे म्हणाले, कुसुमाग्रजांची कविता कणा. मी त्यांना विचारलं सर मला माफ करा पण कणा म्हणजे काय ते सांगा, त्यांनी उत्तर दिलं Spine. छावा हा चित्रपट करुन मला त्या शब्दाचा अर्थ समजला आहे”.
आणखी वाचा – कोट्यवधींच्या मन्नतला शाहरुख खानचा रामराम, कुटुंबासह दुसरीकडे राहायला जाणार, कारण आहे खूपच खास
कणा
ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्रा वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरीही मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा
विकी कौशलने सादर केलेल्या या कवितेला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. आणि या कार्यक्रमानंतर विकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.