बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. गुरुवारी पहाटेच्या वेळी सैफवर राहत्या घरी अज्ञात लोकांनी घुसून त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने धारधार चाकूने तब्बल सहा वार केले. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याच्यावर सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्याच्या एका जखमेतून चाकूचा एक तुकडा काढला असल्याची माहितीदेखील डॉक्टरांनी दिली. दरम्यान सैफवर झालेल्या हल्ल्याने बॉलिवूडमधील अनेकांना मोठा धक्का बसला. अनेक कलाकरांनी हा प्रकार खूप धक्कादायक असल्याचेही सांगितले. अशातच ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी पोस्ट करत या प्रकरणाचा जाहीर निषेध केला आहे. (shatrughan sinha social media post)
शत्रुघ्न हे सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपले मतही व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यांनी सैफवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबद्दलची पोस्ट करत लिहिले की, “दुखद व दुर्भाग्य”. तसेच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. शत्रुघ्न यांनी शेअर केलेला फोटो मात्र नेटकऱ्यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी सैफ व करीना कपूर यांचा AI चा वापर करुन तयार करण्यात आलेला फोटो पोस्ट केला आहे.
Very sad & unfortunate the tragic attack on our near, dear & loved #SaifAliKhan which injured him severely. Thank God he is healing well to recovery. Profound regards to my all time favorite 'show man' filmmaker #RajKapoor's granddaughter #KareenaKapoorKhan & the family. One… pic.twitter.com/R16hEDrXQT
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) January 19, 2025
या शेअर केलेल्या फोटोमध्ये सैफ रुग्णालयातील एका बेडवर झोपलेला दिसून येत आहे. तर करीना त्याच्या बाजूला बसलेली आहे. यामध्ये दोघंही हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत शत्रुघ्न यांनी लिहिले की, “आमच्या जवळच्या व लाडक्या सैफवर झालेला हल्ला खूप दु:खद व दुर्भाग्यपूर्ण आहे. या हल्ल्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे. तो आता ठीक आहे ही देवाची कृपा आहे. माझ्या लाडक्या ‘शो मॅन’ खूप प्रेम. तसेच राजकपूर यांची नात करीना कपूर खानच्या कुटुंबाला खूप शुभेच्छा”.
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “एक कळकळीची विनंती. द्वेष पसरवण्याचे काम करु नका. पोलिस त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत. आपले मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला दाद देतो. हे प्रकरण अधिक चिघळवू नका. लवकरच सगळ्या प्रकरणाचा छडा लागेल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व माझे मित्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी धन्यवाद. सैफ एक उत्तम कलाकार आहे. तसेच तो पद्मश्री व राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. लवकर बरा होईल”.
दरम्यान शत्रुघ्न यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “सर, सैफ व करीनाचा AI फोटो लावायची काय गरज आहे?”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “असं करताना लाज वाटत नाही का?” शत्रुघ्न यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराने असा फोटो शेअर करण्याची अपेक्षा नव्हती असंही म्हंटलं आहे.