बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा कित्येक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आला आहे. ८०-९०च्या दशकामध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या मुलांना चित्रपटसृष्टीमध्ये लाँच केले आहे. अनेकांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले तर काहींच्या पदरी अपयश आले. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणे सोपे आहे पण तिथे जागा टिकवून ठेवणे मात्र कठीण. अपयश पदरी पडलेला हिंदी चित्रपटसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणजे रजत बेदी. २००३ मध्ये आलेल्या राकेश रोशन यांच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. पण रजत यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे. तरीही रजत यांना यश का मिळाले नाही? सध्या ते काय करतात? जाणून घेऊया. (Actor Rajat Bedi)
रजत यांचे कुटुंब हे चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७० रोजी मुंबई येथे झाला. लेखक राजेंद्र बेदी यांचे नातू आणि दिग्दर्शक नरेंद्र बेदी हे त्यांचे वडील आहेत. रजत यांच्या वडिलांनी ‘जवानी दिवानी’, ’बेनाम’, ‘अदालत’ आणि ‘रफू चक्कर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांची आई वीणा यादेखील उत्तम लेखिका आहेत. एकूणच रजत यांचे संपूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते.
१९९४ मध्ये रजत यांनी मुंबईतील ‘मॅन हंट’स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. व्यक्तिमत्त्व आकर्षक असल्याने ते या स्पर्धेचे विजेतेही झाले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांना वाटले की, चित्रपटांच्या ऑफर येतील. पण असे झाले नाही. ते चित्रपटाच्या ऑफरची वाट पाहू लागले आणि कालांतराने चित्रपट मिळवा म्हणून त्यांनी दिग्दर्शकांना असिस्ट करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! रकुल प्रती सिंह व जॅकी भगनानीचा शाही विवाहसोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी
रजत यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते रमेश सिप्पी यांना असिस्ट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दोन ते तीन वर्षानंतर त्यांना २००१ साली मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट मिळाला.त्यानंतर ‘जोडी नं १’, ‘ये दिल आशिकाना’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’, ‘जानी दुश्मन’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले. २००३ मध्ये राकेश रोशन यांच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटामध्येही काम करण्याची संधी मिळाली. पण राकेश यांनी स्वतःच्या मुलाला पुढे आणण्यासाठी चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यांचे बरेच सीन कापले असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र त्यांचा सिनेसृष्टीवरील विश्वास उरला नाही आणि ते कॅनडाला स्थलांतरीत झाले.
कॅनडामध्ये जाऊन त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. त्यांचा व्यवसायाला यशही मिळाले. ते पत्नी मोनलिसा व मुलांसह कॅनडामध्येच राहत होते. पण काही काळाने ते पुन्हा मुंबईमध्ये आले. त्यांनी हिंदी मालिकांमध्ये लहान-मोठे रोल केले. तसेच ते काही पंजाबी चित्रपटांचे निर्मातेदेखील होते.