दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद व धक्कादायक बातमीसमोर येत आहे, ती म्हणजे प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. ते ५२ वर्षांचे होते. (रविवार, ०३ नोव्हेंबर) रोजी त्यांचा मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच ते गेल्या आठ महिन्यांपासून उत्तर बेंगळुरूमधील मदननायकनहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. लोकांना दुर्गंधी आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Director Guruprasad Death)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधील पंख्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक (बंगळुरू ग्रामीण) सीके बाबा यांनी याबद्दल असं म्हटलं आहे की, “चित्रपट निर्माता गुरुप्रसाद काही गोष्टींबद्दल नाराज होते, मग ते त्यांच्या चित्रपटाबद्दल असो किंवा इतर गोष्टींबद्दल. ते काही आर्थिक तणावाशीही झुंजत होते. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना या घरात येताना शेजाऱ्यांनी पाहिले होते. तेव्हापासून ते बाहेर गेला नव्हते. त्यामुळे पाच-सहा दिवसांपूर्वी गळफास लावून त्यांचा मृत्यू झाला असावा”.
‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान, गुरुप्रसाद यांच्या निधनाचे वृत्त येताच कन्नड कलाकार व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही बातमी ऐकून त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
गुरुप्रसाद यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २००६ मध्ये ‘माता’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. यानंतर ‘एडेलू मंजुनाथ’ हा दुसरा चित्रपट केला. गुरुप्रसाद रिॲलिटी टीव्ही शो ‘डान्स कर्नाटक डान्स’चे परिक्षक होते. तसेच त्यांनी ‘बिग बॉस कन्नड २’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनही भाग घेतला होता.