बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांमध्ये आजही अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. इंडस्ट्रीतील सुरुवातीचा काळ मिथुन यांच्यासाठी खूपच कठीण होता. काम न मिळणं, इंडस्ट्रीकडून डावललं जाणं अशा कित्येक गोष्टी त्यांच्याबरोबर घडत गेल्या. मिथुन यांनी याबाबत अनेकदा बोलूनही दाखवलं. मात्र हार न मानता त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग ते झाले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता मिथुन यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती कलाक्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहे. पण हे सगळं करत असताना बॉलिवूडबाबत त्याला काही वाईट अनुभव आले. नमाशीने याचविषयी आता धक्कादायक खुलासे केले आहेत. (mithun chakraborty son namashi)
नमाशीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील लोक खोटे असल्याचं म्हटलं आहे. वडील मिथुन चक्रवर्ती या सगळ्याला अपवाद असल्याचंही नमाशीचं म्हणणं आहे. नमाशी म्हणाला, “१९९०मध्ये वडील मिथुन यांच्या करिअरला उतरती कळा लागली होती. तेव्हा त्यांनी कमी बजेटचे अॅक्शन चित्रपट केले. त्यांना बी ग्रेडचा कलाकार म्हणून बोललं जायचं. त्यांनी स्वतःची एक वेगळी इंडस्ट्री तयार केली. पण मीडियाने त्यांना कधीच उचलून धरलं नाही”.
आणखी वाचा – वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्…; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर
पुढे तो म्हणाला, “बॉलिवूड आऊटसायडर्सला काम देणं विसरला आहे. तुम्ही इंडस्ट्रीत कोणाला ओळखता?, तुमचा पाठचा इतिहास काय आहे?, तुमचं आडनाव काय आहे? यावर काम मिळणं अवलंबून असतं. सुरुवातीच्या काळात ज्याच्याकडे टॅलेंट असायचं त्याला यश मिळत होतं. आताच्या काळात जर मिथुन चक्रवर्ती बंगालमधून आले असते तर बॉलिवूड त्यांना लाँच करण्यात उत्साही असतं असं मला वाटत नाही. आम्ही टॅलेंट बघत नाही. आम्ही फक्त आडनाव बघतो”.
नमाशीने अगदी उघडपणे बॉलिवूडची पोलखोल केली. आडनाव आणि ओळख काय आहे? हे पाहूनच कामं दिली जातात हे त्याने अगदी ठळकपणे सांगितलं. बॉलिवूडचा काळा बाजार यामधून स्पष्ट दिसत आहे. नमाशीने २०२३मध्ये ‘बॅड बॉय’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. नमाशी महेश भट्टसह आगामी प्रोजेक्ट करणार असल्याच्याही चर्चा आहेत.




