१३ मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर याठिकाणी होर्डिंगची घटना घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून १४ ते १५ जण या घटनेत मृत्यूमुखीदेखील पडले. या दुर्घटनेत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा ही मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे अपघातानंतर सुमारे ५६ तासांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले कार्तिक आर्यनचे मामा-मामी हे इंदूर विमानतळाचे माजी संचालक मनोज चांसोरिया व त्यांची पत्नी अनिता चांसोरिया मरियम चौक, सिव्हिल लाईन्स, जबलपूर येथे राहत होते.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य त्यांच्या कारने मुंबईला गेले होते. सोमवारी ते जबलपूरला परतत होते. यावेळी ते पेट्रोल भरण्यासाठी ती घटना घडलेल्या पेट्रोल पंपावर थांबले होते आणि होर्डिंग पडलेल्या त्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ‘न्यूज १८’ला मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनोज चांसोरिया आणि त्याची पत्नी अनिता चांसोरिया हे रविवारी त्यांचा मुलगा यशला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार होते, तो व्हिसा काढण्यासाठी मुंबईला गेला होता, मात्र यशचे आई-वडिलांशी बोलणे होऊ शकले नाही.

त्यानंतर सोमवारी मुंबईत घडलेल्या होर्डिंगच्या त्या घटनेत त्याचे आई-वडीलही अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून त्याला समजले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१५ मे) घटनास्थळी पोलिसांना ढिगाऱ्याखाली दोन मृतदेह सापडले. मृतदेह तीन दिवस ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. शेवटी मुलाने अंगठी व अंगावरील दागिन्यांवरून आई-वडिलांची ओळख पटवली. त्यानंतर काल (१६ मे गुरुवार) मुंबईत मृत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आर्यनच्या मामा-मामीच्या मृत्यूमुखी पडल्याच्या वृत्ताने अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या वृत्तावर अनेकांनी शोक व्यक्त केला असून अनेकांनी याबद्दल सोशल मीडियाद्वारे दु:खही व्यक्त केले आहे.